शुक्रवार, २ सप्टेंबर, २०११

सबको सबक सिखाना है

सफर इतना आसां नहीं यारो 
बहुत दूर जाना है|
पल भर का विश्राम यारो
 सबको सबक सिखाना है||

सरकार भी अब डर गयी थी 
उपाय न कोई बची थी |
चर्चा का किया दिखावा यारो
आखिर अनशन को तुड़वाया यारो||

अंदर की ये बात बताये 
कोई  न चाहता  की लोकपाल  आये 
फिर  न मिलेगा  चारा  न मिलेगी  घास 
फिर कैसे  लगेगी  घरमे  पैसे  की रास 

सफ़र  इतना  आसां नहीं यारोबहुत दूर जाना हैपल भर का विश्राम यारो
सबको सबक सिखाना है

गुरुवार, २३ जून, २०११

सत्ता समीकरण

महाराज: प्रधानजी........... कुठे होतात तुम्ही ? कधी पासून आम्ही आपला इंतजार करत होतो.....आज ११ वाजले तरी आपला दरबारात पत्ता नाही....काय चालू काय आहे या राज्यात?
प्रधानजी: महाराज!! (लवून मुजरा करतो)....माफी असावी........पण महाराज काय एक एक exciting घडामोडी चालू आहेत राज्यात आणि तुम्ही काय इथे दरबारात लोकांची वाट बघत बसलात? थोडा वेळ TV पहा मजेत वेळ निघून जाईल.
महाराज: काय ते उपोषण, सत्याग्रह वगॅरेंबद्दल म्हणत असाल तर सध्या तिकडे लक्ष द्यायची आम्हाला गरज वाटत नाहिये. आमचं कुशल मंत्रीमंडळ आणि कुट्नीती department त्यांची चोख व्यवस्था लावतीलच यात आम्हांला शंका नाही.
प्रधानजी: ते ठीक आहे आहे पण या घोटाळ्यांचं काय? या भ्रष्टाचारावर काय उपाय आहे आपल्याकडे? या प्रश्नावर प्रजा फारच भडकलेली आहे.
महाराज: काय बोलता काय प्रधानजी, तुम्ही काय काल आले का राजकारणात? तुम्हाला माहित आहेच आम्ही एका समितीची स्थापना केली आहे. तिचा अहवाल येइल तेव्हा येवुदे.. आणि दोषींवर कठोर करवाई करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत असं निवेदन सगळीकडे छापुन आलं आहेच. काही चिंता नको.निवड्णुकांना तसा बराच वेळ आहे, जनता तशीही विसराळु आहे.
प्रधानजी: मग आपण एखादं निवेदन प्रकाशित करा किंवा पत्रकार परिषद?
महाराज: प्रधानजी काय वेडे कि काय तुम्ही? सध्या शांत रहाणे चांगलं. तुम्ही आमचा परदेश दौरा आयोजित करा...सगळं सुरळीत होईल निवडणुकीपर्यंत.

प्रधानजी तुम्ही सकाळी सकाळी या काय क्षुल्लक विषयात अडकलात? इथे मी वेगळ्याच चिंतेत होतो. उद्या युवराजांचा बारावीचा निकाल लागेल. आमचं हे रत्न म्हण्जे आनंदच आहे....मुश्कीलीने ५०% तक्के मिळाले तरी खुप झाले.
प्रधानजी: यात चिंता करण्यासारखं काय आहे?
महाराज: महाराणींना त्याला Engineer बनवायचे मनात आहे. problem झाला आहे तो त्या CET मुळे, CET मधे हा किती टक्के मिळवणार? आणि कसा Engineer बनणार?
प्रधानजी: महाराज,आपली काळजी व्यर्थ आहे....आपल्या मंत्र्यांपैकी अनेकांची मोठी मोठी इंजिनीरिंग colleges
सगळीकडे पसरली आहेत. CET वगेरे सगळं झूट आहे, तुम्ही फक्त नाव सांगा महाराज....युवराजाना तिकडे admission
मिळालीच म्हणून समजा.. नाहीतरी management seats भरणार तरी कश्या...? आणि आपले मंत्री तुमचं काम करणार नाहीत काय? तात्पर्य काळजी सोडा....
महाराज: आरे सांगता काय प्रधानजी...म्हणजे चिंताच मिटली. बघा सगळे प्रश्न कसे हळूहळू सुटत आहेत....आता हेच पहा ना उपोषणे, भ्रष्टाचार इतकाच काय आमचेच अनेक मंत्री जेल मध्ये आहेत. आमचे काही नुकसान?
प्रधानजी: नुकसान नाही असं कसं म्हणता ?
महाराज: परवाच ४ राज्यांच्या निवडणुका झाल्या...त्याच्या निकालावरून तरी आमचं काही नुकसान झाल्याचं आम्हाला तरी दिसत नाहीये.
सत्ता टिकणे महत्वाचे...दर ५ वर्षांनी निवडणुका येतात...पहिली २ वर्ष अशीच जातात...मधल्या २ वर्षात काही तरी केल्याचे दाखवायचे...आणि शेवटच्या पाचव्या वर्षात पुढच्या निवडणुकीची धोरणे आणि जनकल्याण याद्वारे काहीतरी केल्याचा आव आणायचा!! पहिल्या ३ वर्षांचे जनतेच्या काही लक्षात नसते... शेवटच्या २ वर्षात आम्ही काहीही वाईट न होण्याची खबरदारी घेतो..पुढच्या निवडणुकीत सत्ता पक्की असं समीकरणच आहे.. आणि मौनाचे पालन महत्वाचे
मौनात फार शक्ती आहे असं म्हणतात त्याचा प्रत्यय येतो आहे.

मौनं सर्वार्थ साधनं!!

प्रधानजी: वा वा क्या बात कहि है? आनंद आहे.....
महाराज कि जय!!! मुजरा.......

बुधवार, २ मार्च, २०११

पनोती

नेहमीप्रमाणे मी ईंटरसिटी एक्स्प्रेसनी मुंबईला निघालो होतो. आजुबाजुच्या सहप्रवाश्यांकडे किरकोळ नजर फिरवण्याचा कार्यक्रम झाला. उल्लेखनीय चेहेरा न दिसल्यानेच बहुधा आपोआपच मला झोप लागली असावी. तशीही मला प्रवासात झोप येण्यासाठी फारसे कष्ट कधी घ्यावे लागत नाहित,काही वेळाच्या गाढ झोपेनंतर साधारणतः लोणावळ्यानंतर मला जाग आली. IRCTC चा 'मसाला चाय....' घेतला. मग मी येणाऱ्या जाणाऱ्या विक्रेत्यांकडे पहात वेळ्काढूपणा करत होतो. प्रथम एक पुस्तकवाला येवुन गेला, मग एक मॅजिक बुक वाला चक्कर टाकुन गेला, चिक्की वाले, जेली वाले आणि कट्लेट आम्लेट तर सारखीच ये-जा करत होता इतके कि त्यांची आता कटकट होत होती.

काही वेळानी एक बारकासा पोरगा आला, खाकी डगला, हाप चड्डी, खाद्यावर एक छोटी पिशवी. ऍटीतच त्यानी पहिल्या रांगेतल्या खिडकीच्या वरच्या मोकळ्या जागेत एक प्लॅस्टीकचा स्पायडरमॅन टाकला आणि मोठ्या अभिमानाने आरोळी ठोकली " चला स्पायडरमॅन, चलता फिरता स्पायडरमॅन, बच्चो को खेलने के लिये, गिफ्ट केलीये......"
हा स्पायडरमॅन भिंती वर टाकला कि आपोआप उलटा पालट होत हळूहळू खाली येवू लागतो, दिसायला छान वाटतं. लहान मुले लगेच आई वडिलांकडे ह्या स्पायडरमॅन ची मागणी करतात. (स्पायडरमॅन च्या हाता- पायाला एक चिकट पदार्थ लावलेला असतो ज्यामुळे तो असं भिंतीवरून आपोआप खाली येतो)  
पण आज त्या मुलांनी खिडकीच्या वर टाकलेला स्पायडरमॅन काही खाली आलाच नाही, एक नजर त्या चिकटलेल्या स्पायडरमॅन वर टाकत ह्या मुलाची आरोळी मात्र न थांबता चालूच होती. काही काळाने मात्र तो वैतागला आणि तो स्पायडरमॅन काढून मागे दरवाजा असतो त्या मोकळ्या जागेत गेला, तेथे त्यांनी तो स्पायडरमॅन एका दरवाज्यावर टाकला, अपेक्षित पणे तो कोलांट्या उड्या मारत खाली खाली येवू लागला. पोराच्या चेहेऱ्यावर एक विजयी समाधान दिसले, त्याने तीन चार वेळा त्या स्पायडरमॅन ची पूर्व परीक्षा घेतली आणि पुन्हा तो डब्यात आला, तितक्याच उत्साहात त्याने पुन्हा तो स्पायडरमॅन खिडकी वरील मोकळ्या जागेत फेकला आणि नेहमीची आरोळी ठोकली. पुन्हा तीच तऱ्हा स्पायडरमॅनच आज काहीतरी बिनसलं होता, इतके वेळा चाचणी घेवून देखील ऐन परीक्षेत गडी नापास होत होता, थोडक्यात भरवश्याच्या म्हशीला टोणगा. अगदी स्पष्टच सांगायचा तर आपल्या भारतीय क्रिकेट टीम सारखं. आणि कुठलीही हालचाल न केल्यामुळे स्पायडरमॅनला कुणीही विकतच काय पण बघायला हि घेत नव्हता.

मुलाच्या चेहेऱ्यावर काहीसा राग स्पष्ट दिसत होता, पण त्याने पुन्हा मागे जावून काही काळ स्पायडरमॅन ची परीक्षा घेण्यात घालवला, 'इधर बराबर से नीचे आ रहा है साला! ' असं काहीसं माझ्या कानावर पडलं, बाजूच्या एका त्याच्याच वयाच्या चिक्की विक्रेत्याला तो सांगत होता.
काही काळ असाच स्पायडरमॅनची परीक्षा घेण्यात आणि त्याला शिव्या देण्यात गेला. तो आता वेगळ्याच निर्धाराने पुन्हा डब्यात प्रवेशाला, पूर्वीपेक्षा खणखणीत  आरोळी दिली " चला स्पायडरमॅन, चलता फिरता स्पायडरमॅन, बच्चो को खेलने के लिये, गिफ्ट केलीये......" न बघताच त्याने स्पायडरमॅन पुन्हा फेकला याही वेळी स्पायडरमॅननी अपेक्षित हालचाली केल्या नाहीत तसाच चिकटून राहिला. त्यांनी तो घट्ट चिकटलेला स्पायडरमॅन काढला आणि तश्याच आरोळ्या देत तो पुढे चालत राहिला. कोण विकत घेतोय नाही घेत त्याला काहीही सोयर सुतक नव्हतं, कुठेही निराशा नव्हती, दु:ख नव्हते, जिद्द मात्र प्रकर्षानी जाणवत होती. कदाचित याचमुळे एक दोघांनी पुढे पहिले आणि विकतही घेतले. त्या आपल्या नायकाकडे मी बराच वेळ पाहत होतो, असाच काही वेळ निघून गेला, मागून पुन्हा त्याच मुलाचा आवाज पुन्हा येवू लागला, "मॅजिक बुक लेलो.............मॅजिक बुक". मी चमकून मागे पहिला तर तोच मुलगा, पूर्वीपेक्षाही अधिक उत्साहानी हा नवीन (उसना) धंदा जोरात करत होता. माझ्या जवळ येताच म्हणालो " अरे वो स्पायडरमॅन  को पुरी धूल लगी थी, इसलिये नीचे नाही आ रहा, जरा दुसरे से ट्राइ करो", तो काही क्षण वाया न घालवता म्हणाला "मैने हि लगाई थी धूल, नही तो सिधा नीचे गिरता है!......  कूच नही साब ये गाडी हि पंनोती है, सिंहगड मी १०००-१००० रुपये का धंदा है....क्या बिकता है ये स्पायडरमॅन.......पनोती है क्या कर सकता है .........."

आयुष्यातल्या एका अडथळ्याला, शुल्लक पणे 'पनोती' ठरवून त्याने तो सहज पार करून टाकला होता, आणि एवढ्यावरच न थांबता.......तो तसाच पुढे चालत होता........आपण मात्र त्याच त्या अडथळ्या भोवती   घुटमळत राहतो.....आणि मग काय ..... प्रवासच खुंटतो!  

शनिवार, २६ फेब्रुवारी, २०११

श्रद्धेची दुकाने- १

सध्या माझा फार गोंधळ उडालेला आहे. हे सोन्याच्या सिंहासनात बसलेले साईबाबा, सोन्याचे पितांबर, माणिक मोत्यांनी मढ़वलेला मुकुट घालून बसलेले श्रीमंत दगडूशेट गणपती (देवही श्रीमंत, गरीब असे विभागले गेले आहेत), कोट्यावधीची संपत्ति असणारे तिरुपतिचे बालाजी...हे सगळे बघून हा गोंधळ अजुनच वाढत आहे.  अरे बापरे.... हे काय चालू आहे? सध्या देवाची भक्ति करणे म्हणजे नुसत नमस्कार करून, स्तोत्र म्हणून होत नाही तर जास्तीत जास्त पैसे, सोनं, चांदी, दक्षिणा दिलीत तर तुम्ही खरे भक्त. त्या देवस्थानांचे ट्रस्टी देखिल ह्या संपत्तीसंचयात बुडालेले दिसतात.
हे इथेच थांबत नाही तर ह्याच बरोबर अनेक बुआ, बाबा, महाराज, योगी, सतगुरु हे तर इतके झाले आहेत की त्यांची अजिबातच गणना नाही. जागोजागी ह्यांची प्रवचने चाललेली आपण पहात असालच.ह्या प्रवचनांना सत्संग म्हणतात. मी मधे ऐकले होते कि कुणाच्या तरी सत्संगाच्या शेवटच्या दिवशी महाराजांचा प्रसाद घेण्यासाठी प्रचंड गर्दी होते. प्रसाद म्हणजे काय तर अग्नीशमन दलाचे बंब मागवतात आणि त्यातुन रंगीत पाणी हे महाराज भक्त जनांवर पाइप ने उडवतात. ह्यात भक्त गण धुंद होवुन भिजत असतात, मग काय कधी कधी यात धक्काबुक्की होते, चेंगरा-चेंगरी होते, क्वचित प्रसंगी चोरीचे प्रसंग हि उद्भवतात.

पण या उदंड देव आणि महाराजामुळेच आपणासारख्या गरिब भक्तांना मोठा चॉइस मिळत आहे, मग कही लोक गणपतीचे निस्सीम भक्त; काहीही चांगलं झालं की निघाले सारसबागेत (किंवा दगडूशेट ला), हाच गणपतीचा भक्त मुंबईत असेल तर फक्त सिद्धिविनायक बाकी कुठलाही गणपती नाही, काही लोक शंकराचे, काही देवीचे, काही इतर कुणाचे, याच बरोबर काही महाराज आणि गुरुंना मानणारे देखिल आहेत. स्वत:ला प्रचंड मॉडर्न वगेरे समजणारे, देव वगेरे झूठ, अंधश्रद्धा अशा बाता मारणारे माझे काही मित्र साडेसाती आली की शनीच्या मंदिरात तेल आणि माळ घेवुन लाइन लावलेले दिसतात, आता ह्याल काय म्हणायचे? (तसा मॉडर्न आणि देवळात जाण्या न जाण्याचा काहीही संबंध नाहीये, माझं म्हणणं इतकच कि उगाच का मग बाता मारायच्या?)

साधारणतः भक्ति किंवा धार्मिक भावना अनुवांशिक असते. म्हणजे घरातील आई वडिल कुणा देवाला मानत असतील तर आपोआपचे ते गुण पुढील पीढित उतरतात. मुलही पुढे त्या महाराजांची पूजा-अर्चा करू लागतात. कधी कधी आयुष्यात येणारया संकटांना तोंड देता देता आपल्या आराध्य देवते वरील श्रद्धा म्हणूया किंवा विश्वास याचा क्षय होवू शकतो. पण यातच कुणी हितचिंतक अजुन एका बाबांचे नाव सुचवतो, 'त्यांच्या कड़े जा सगळे प्रश्न सुटतील सगळी संकट दूर होतील.' बाबांच्या नशिबानी त्या माणसाच्या सगळ्या चिंता दूर होतात, त्यादिवासपसून तो त्या बाबांचा निस्सीम भक्त कधी बनुन जातो हे त्यालाही कळत नाही.
आमच्या घरात लहानपणापासुनच तसा धार्मिक वातावरणात  मी वाढलो. दर गुरवारी, चतुर्थीला आरती यामुळे आरत्या, अथर्वशीर्ष हे अगदी तोंडपाठ. गणपतीत आरत्या म्हणताना, त्या नंतर चढ्या आवाजातील मंत्रपुष्पांजलि एका सूरत म्हणताना फार मजा यायची. घरी सोवळं ओवळं कडकपणे पाळलं जाई, असं सगळं असलं तरी आमच्या घरच्यांनी कधीही धार्मिकतेची सक्ती केली नाही, याबाबतीत संपुर्ण स्वातंत्र्य दिलं गेलं. कदाचित यामुळेच देवाबद्दल आणि धर्मासंबंधी अतिशय स्पष्ट मत बनण्यास मदत झाली.

मध्यंतरी आमच्या ऑफिस मधील एका ईटालीयन colleague नी हिंदू धर्माबद्दल माहिती विचारली, हिंदू धर्मात एक नाही दोन नाही तर तब्बल ३३ कोटी देव आहेत हे ऍकल्यावर तो अगदीच चकीत झाला, त्याचा चेहेरा पहाण्यासारखा झाला होता. मला तो विचारतो why? why? so mony gods? मला विचारतो तुमचं एका देवानी समाधान होत नाही का? 

खरंच चांगला प्रश्न आहे की का इतके सगळे देव?

अनेक पुर्वजांनी हे उत्तर आधीच देवुन ठेवलं आहे, त्यामुळे माझं उत्तर लगेच तयारंच होतं. यातील स्वामी विवेकानंदांचे उत्तर मला जास्त भावतंआणि योग्यही वाटतं.

'तुमचा समाज सामजिक द्रूष्ट्या विकसित झाला आहे प्रगत आहे, म्हणुनच सामजिक तत्वाबाबत समाजाला स्वातंत्र्य आहे, मोकळेपणा आहे, समाजाचे विचारही पुरोगामी आहेत. भारत याबाबत मागास असला तरी धार्मिक द्रुष्ट्या अतिशय प्रगत, विकसित आहे यात अजिबातच शंका नाहीये, कारण आपले आरध्य निवडी बद्दल कुठलीही सक्ती नाहीये, बंधनं नाहीयेत. तत्वतः सर्व देव एकच आहेत आणि त्यांची आराधना करणारे सर्व हिंदू आहेत. त्यामुळे दिसायला जरी ३३ कोटी देव असले तरी ते सर्व एकाच तत्वाची विविध रुपे आहेत.'
हि  माहीती ऐकून तो खरचं चकीत झाला, पुढे म्हणाला 'कि ह्या लॉजिक नी मी सुद्धा हिंदूच आहे, फक्त मी येशु ला मानतो, मी त्याचा भक्त आहे'

हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे वर नमुद केलेली सद्य परिस्थिती आणि आपली तत्वे ह्याची काहीच टोटल लागत नाहिये.  जागोजागी विखुरलेली भविकांची श्रद्धास्थाने हि श्रद्धेची दुकाने झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
धार्मिक द्रुष्ट्या पुरोगामी असलेले आपले पुरातन तत्वज्ञान, विचार ह्या श्रद्धेच्या दुकानांनी अगदीच कुचकामी केले आहेत. भक्ती जर वैयक्तिक दुर्बलतेच कारण होत असेल तर हिंदू धर्माचे जे अतिशय प्राचीन आणि अतिशय उदात्त असे जे तत्वज्ञान आहे त्याचे पुनर्जीवन करण्यासाठी तरुणांनी पुढील किमान ५० वर्षे तरी फक्त भारत भुमिलाच आपले देव मानण्याची गरज आहे

------------------------------------------------------------------------------------------------------

ह्या विषयावर लिहिण्यासारखं खुप आहे, यथावकाश याच विषयावर अजुन लिहिता यावं यासाठी '१' नी श्री-गणेशा केला आहे.           
                                    
      
                              

रविवार, १३ फेब्रुवारी, २०११

अडीचशे वर्षांचा लकडी पुल


पुणेकरांच्या गेल्या दहा पिढ्यांना ज्याने मुठेच्या एका तीरावरून दुसऱ्या तीरावर पोचवले, त्या लकड़ीपुलाच्या उभारणीस आज अडीचशे वर्षे पूर्ण होत आहेत. पानिपतावरून आलेले सैन्य शहरात येण्यासाठी याची उभारणी केली गेली, अशी या संदर्भात आख्यायिका आहे. १७६१ मध्ये वैशाख महिन्यात बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांनी लकडी पुलाचे काम सुरु केले. ते स्वतः या कामावर रोज जावुन पाहुन येत.
तीस दिवसांत हा पूल बांधला गेला, त्यानंतर अल्पावधीतच नानासाहेबांचे पर्वतीवर २३ जून १७६१ रोजी निधन झाले. त्यांना पुलानजीकच अग्नी देण्यात आला. त्यानंतर काही काळातच नारायणराव पेशवे यांचाही पुलानजीक अंत्यवीधी करण्यात आला. या घटनांप्रमाणेच पुलानजीक सावरकरांनी केलेली विदेशी कपड्यांची होळी, १८९३ पासून दरवर्षी येणारी अनंतचतुर्दशीची मिरवणुक व पुर्वीच्या काळात त्यानंतर होणार्या सांगता सभा, पावसाळ्यात मुठेचे दुथडी भरुन वाहणारे, पुलापर्यंत येणारे पाणी, १९५८ चा मोठा पूर व पानशेतचा प्रलय अशा अनेक घटनांचा हा पुल साक्षीदार आहे.

१७६१ मधे लाकडामध्ये बांधलेला हा पूल १८४० मध्ये आलेल्या पुरात मोडला व याच जागी पक्का पूल  बांधण्यात आला. यासाठी ४७ हजार रुपये खर्च झाला. या पैकी ११ हजार रुपये ब्रिटीशांनी पुणेकरांकदुन वसुल केले. तेव्हा हा पूल १८ फुट रुंदीचा बांधण्यात आला होता व रेल्वे सुरु होण्यापुर्वी मुंबईला जाण्यासाठी हाच मार्ग असल्याने येथे मोठी रहदारी असे. पूढे येथिल रहदारीस पूल अपुरा पडु लागल्याने १९२८ मध्ये पुलाची रुंदी ३७ फु करण्यात आली. या कामास ४०००० रुपये खर्च झाला. परंतु कालांतराने हे रुंदीकरणही अपुरे पडु लागले व पुन्हा एकदा १९५० मध्ये रुंदीकरणाचे  हाती घेण्यात आले. दिड वर्ष रोज २०० मजूरांनी काम करुन पूल ७६ फूट रुंद केला. १९५२ मध्ये जून महिन्यात हे काम पुर्ण होवुन त्याचे उद्घाटन झाले.याच काळात लकडीपुलाचे संभाजीपुल असे नामकरण करण्यात आले            

पुलाच्या रुंदीकरणाने १९४८ पर्यंत स्मशान असलेला भागही बदलुन गेला, लकडी पुल हा पुर्वापार पुणेकरांच्या जिव्हळ्याचा विषय राहिला आहे. लकडी पुलावर उभे राहुन मुठेच्या पूरात उड्या मारणे, हा प्रतीवर्षीचा उपक्रम. १३ जूलै १९६१ ला पुणेकरांनी पुलावर अशीच गर्दी केली होती, पण काहिकाळातच त्यांच्या लक्षात आलं की हा नेहमीचा पूर नाही.या पूरामुळे लकडी पुलाचे मोठे नुकसान झाले व पुढे ८ दिवस सैनिकांनी पादचारी व सायकलस्वार यांच्यासाठी पर्यायी पूल सुरु केला.
१७६१ पासुन १९२३ पर्यंत म्हण्जे १६२ वर्ष पुणे शहरात हा एकच पूल होता, पुढे १९२३ साली शनिवारवाड्यासमोरील पुलाचे काम पूर्ण झाले, आज पुण्यात मुठानदीवर १५ पूल आहेत. पण पुणेकरांच्या मनात व पुण्याच्या इतिहासात लकडी पुलास मानाचे स्थान आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
सौ: सकाळ

सोमवार, २४ जानेवारी, २०११

इंद्रदेवाची सत्ता धोक्यात??

टेन्शन....टेन्शन...टेन्शन....या टेन्शन मुळे आज देवाधीदेव इंद्रालाही निद्रादेवी प्रसन्न होत नव्हती, काही केल्या आज झोप काही येत नव्ह्ती. मधे जरा डोळा लागतोय न लागतोय तोच भूलोकीचे असूर मुलायम, लालु सिंहासन हलवत उखडुन टाकत आहेत यासारख्या भयानक स्वप्नांनी दचकुन जाग येत होती. ब्लड प्रेशरचा त्रासही पुन्हा सुरु झाल्यासारखं वाटत होतं. 'सालं आजकालच्या अमृतामध्येसुद्धा पूर्वीसारखा गुण राहिला नाहीये. मी तर सकाळ संध्याकाळ अर्ध्या ग्लास डोस घेतो...पण काही उपयोग नाही'.
सकाळला अजुन ४ तास बाकी आहेत आता ३ तास....या विचारात डोळ्याला डोळा लागला नाही. उद्याचा दिवसच असा होता, इंद्रदेव असला म्हणुन काय झालं? त्यालादेखिल कुणाला तरी रिपोर्ट करावंच लागतंच ना. तो राजा पण शेवटी बोलुनचालुन देव जनतेचा सेवकच ना? मागच्या आठवड्यात अचानक एका देवजनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान जगद्निर्माता ब्रह्मदेव आणि जगद्नियन्ता  विष्णूदेव यांच्या द्विसदस्यिय समितीने देवलोकाचे २०१० सालाच्या कारभाराचं ऑडिट करावं असा निर्णय जाहीर केला आणि दोन त्रुतीयांश बहुमत असलेल्या इंद्रदेवाच्या सत्तेला हादरा दिला होता. तरी बरं इंद्राच्या वकीलांनी ताबडतोप अर्ज करुन ऑडिटला एक आठवड्याची मुदतवाढ मागून घेतली, आणि येणारं संकट अंमळ पुढे गेलं. मागील  वर्ष देवलोकासाठी विलक्षण घडामोडींच आणि धकाधकीचं होतं, विरोधी पक्षांनी सर्व घटनांचा योग्य वापर करुन प्रत्येक दिवस ढकलणं मुश्कील करून ठेवलं होतं.

सगळ्याची सुरवात त्या "त्रिलोक क्रिडास्पर्धांनी" झाली, भूलोकीचे आणि पाताळातील अनेकजण या स्पर्धांच्या आयोजनासाठी उत्सुक असताना देवांनी याचं यजमान पद मिळवण्यासाठी सर्व मार्गांचा वापर करत विजयश्री खेचुन आणली आणि देवलोकाला २०१० च्या "त्रिलोक क्रिडास्पर्धांचे" यजमानपद मिळालं.
वित्तमंत्री कुबेरदेवाकडे खर्चाची जबाबदारी दिली आणि चित्रगुप्ता कडे हिशोबाची सुत्रे दिली, दोघेही आपापल्या क्षेत्रात अत्यंत अनुभवी, प्रवीण होते तसेच ते स्वच्छ प्रतिमेसाठी दोघेही प्रसिद्ध होते. यादोघांच्या निवडीमुळे मी निर्धास्त झालो होतो, यापेक्षा अजुन योग्य नियुक्ती त्रिलोकात कुणालाही करण शक्यचं नव्हतं याविचारानी मी स्वतःवरच खुष झालो होतो. सुरवातीला सगळं सुरळीत चालु होतं पण देवसमाचार, देवलोक २४ x ७ सगळ्या चॅनल्सनी एक एक करुन भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढायला सुरवात केली. इथेच हे सगळं थांबलं नाही तर भूलोक आणि पाताळातही याची चर्चा सुरु झाली. देवलोकाची बदनामी व्हायला सुरवात झाली. "हे विरोधक सुखाचे चार दिवस काही बघु देतील तर शप्पत.....नक्कीच त्यांच कारस्थान असणार" मलाही असंच वाटलं होतं, पण आमच्या देवांनी भ्रष्टाचारात चारा सम्राट लालु आणि कलमाडींनाही मागे टाकलं होतं. अस्तित्वात नसलेल्या कंपनींना कंत्राटं, नातलग, हितचिंतकांना कंत्राटं जमेल त्या मार्गांनी संबंधित देवांनी यथेच्य खावुन घेतलं होतं. 'वाढता वाढता वाढे भेदिले सुर्यमंडळा', बजेट वाढता वाढता इतकं वाढलं कि साक्षात कुबेराला कर्ज घ्यावं लागलं. मी तरी कुठे कुठे बघणार? सही करताना प्रत्येक कागद वाचणं शक्यचं नाही, नेमुन दिलेल्या जबाबदाऱ्या चोख, आणि इमानदारीने पार पाडायला नकोत का? आपलेच दात आणि आपलेच ओठ, कुणाला सांगायचं? चौकशीचे आदेश देवुन कसंबसं प्रकरण शांत केलं, स्पर्धा पार पडल्या......पण फार म्हणजे फार मनस्ताप झाला हो.. आणि बेअब्रु झाली ती निराळीच.

स्पर्धा पार पडल्यापडल्या मी तत्काळ संबधित सचिवांना निलंबित केलं, बाकी मंत्रांच्या चौकशीचे आदेश दिले. (बाकी देव शांत होतात हो अशी 'fast Action' घेतल्यामुळे, काय असतं भूलोकीचे मनुष्य प्राणी असोत वा देवलोकीचे देव प्राणी सगळ्या जनतेची स्मरण शक्ती कमीच..हे एक वरदान राजकारण्यांना मिळालेला आहेच. त्याचा योग्य वापर करणारेच या खुर्ची राजकारणात टिकतात.)
स्पर्धांच्या धावपळीमुळे इंद्राची तब्येत खालावली, हवापालटासाठी काही दिवस कैलास मानसरोवर यात्रेस गेलं. सुट्टी संपवून येईतो देवलोकात हलकल्लोळ माजला होता. सकाळचा पेपर हातात पडताच इंद्राचा ब्लड प्रेशरचा त्रास पुन्हा सुरु झाल्या सारखं झालं.

- महागाई गगनाला.....देवाधीदेवांच्या मंत्र्यांच्या साठेबाजीमुळे देव जनता त्रस्त.
- यमलोक-भूलोक Expressway च्या टोलनाक्याची यमदूतांकडून तोडफोड. प्रलंबित भरमसाठ टोल आणि खड्डेयुक्त रस्त्यांमुळे वाढणाऱ्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर..
- अप्सरेला इंद्रदेवानी बक्षीस म्हणून दिलेल्या flat च्या चौकशीचे आदेश
- यमदेवावर वाढलेलं लोड                 
- क्रीडा घोटाळ्यांवर देवाधीदेवांना कारणे दाखवा नोटीस
- देवालोकाचे कामकाज ठप्प.... विरोधकांकडून इंद्रदेवाच्या राजीनाम्याची मागणी

आरे बाप रे बाप एक ना दोन सारा पेपरच घोटाळ्यांनी भरलेला. अति झाल्यावर काहीतरी ठोस पावलं उचलावीच लागतात ना? त्याचाच परिणाम म्हणजे हे ऑडीट आहे.        
 
पण पुढे काय झालं? इंद्राचा राज्य गेलं? त्यांनी राजीनामा दिला? भ्रष्ट मंत्रांवर कारवाई झाली? कोण कोण दोषी आढळले? कोणाला अटक झाली? महागाई कमी झाली का? टोल कमी आणि रस्त्यांचा दर्जा सुधारला का? मुदतपूर्व निवडणुका?

काळजी करू नका...अहो इतक्या लवकर असं काही होतं का? इंद्राचे शासन निर्विवाद मध्ये चालूच आहे.

दर महिन्याप्रमाणे इंद्रदेवाकडून खालील निवेदन नुकतंच प्रसिद्ध झालं आहे...
"सर्व तथा कथित भ्रष्ट मंत्रांची चौकशी चालू आहे.... कोणी दोषी आढळल्यास, दोषींवर कारवाई करण्यास हे सरकार वचनबद्ध आहे...महागाई हा चिंतेचा विषय आहे...सरकार त्यावर ठोस पावलं उचलत आहे..लवकरच त्याचे परिणाम दिसतील."

स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या निधना बद्दल काय लिहिणार? पुण्यात असल्याने त्यांच्या अंत्यादर्शनाला प्रत्यक्ष जावून नतमस्तक होता आलं हीच एक समाधानाची बाब.
पंत आणि पाठोपाठ भीमसेनजींच्या निधनानी कला क्षेत्रात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

स्वरभास्कराचा अस्ताने शास्त्रीय गायन क्षेत्रात काळोखाच राज्य पसरलं आहे हे नक्की. त्यांनी रचलेल्या 'कलाश्री' रागानेच त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.

http://www.youtube.com/watch?v=9ViMk88PhTM

गुरुवार, १३ जानेवारी, २०११

पंत तुम्हाला मानाचा मुजरा

काही लोकोत्तर पुरुष कुठलाही वारसा नसताना एखाद्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वानी असं काही नावलौकिक मिळवतात कि त्यांचं नाव त्या क्षेत्रात अमर होवून जातं. पणशीकरांच्या संस्कृत, ज्योतिष आणि वेद्शास्त्राची दोन पिढ्यांची परंपरा लाभलेल्या घराण्यात १४ मार्च १९३१ प्रभाकराचा जन्म झाला. आजोबा पंडित वासुदेव शास्त्री पणशीकर, वडिल पंडित विष्णूशास्त्री पणशीकर यां दशग्रंथी पंडितांच्या तालमीत हा सुर्य वाढत होता. या कुटुंबालाच काय पण सगळ्या घराण्याला स्वप्नातही वाटलं नसतं की हा मुलगा पुढे मराठी रंगभूमीवरिल ५० वर्ष अनभिषिक्‍त सत्ता गाजवेल मोठा रंगकर्मी, नटश्रेष्ठ म्हणुन दैदिप्यमान यश मिळवेल,  रसिकांच्या मनात कायमची जागा मिळवेल.
१५ व्या वर्षी हौस म्हणुन शाळेच्या नाटकात केलेली सुरुवात, त्यातील भूमिके बद्दल मिळलेली दाद, वाहवा,  कौतुकच त्यांना रंगभूमीच्या अधिकाधिक जवळ घेवुन गेलं. रंगभूमी आणि त्यांचं घट्ट नातं बनून गेलं हि हौसच पुढे जगण्याचं ध्येय बनलं, ह्याच ध्येयापोटी घर सोडलं, रस्त्यावर दिवस काढले पण माघार कधीच घेतली नाही.
आचार्य  अत्रे लिखीत "तो मी नव्हेच" नाटकाची सुरुवात झाली त्यात प्रभाकर पणशीकरांनी एक नाही दोन नाही तर तब्बल पाच वेगवेगळ्या भूमिका साकार केल्या आणि महाराष्टातच नाही तर शेजारी राज्यातील रसिकांना देखील अक्षरशः वेड लावलं. या नाटकाचे हजारो प्रयोग झाले, फिरत्या रंगमंचाचा प्रथमच वापर करुन कल्पक बुद्धीची ओळख करुन दिली. आपल्या खणखणीत आवाज, स्पष्ट उच्चार, अभिनयकौशल्याच्या बळावर त्यांनी 'तो मी नव्हेच' मधला लखोबा लोखंडे, 'अश्रुंची झाली फुले' मधला प्राध्यापक विद्यानंद, 'इथे ओशाळला मृत्यू' मधला औरंगजेब हि पात्रे अजरामर केली. याच बरोबर ‘जस्टीस देवकीनंदन’, ‘चंदर’, ‘ग्लाडसाहेब’  या भूमिकांनाही रसिकांनी भरभरून दाद दिली
नाट्यसंपदा हि स्वतः ची संस्था उभारली, एकूण ४३ नाटकं त्यांनी रंगभूमीवर आणली त्यांचे हजारो प्रयोग केले, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा पहिला ‘जीवन गौरव पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार असे १६ पुरस्कार त्यांना मिळाले.

या थोर अवलियाला आम्हा रसिकांकडून मानाचा मुजरा!
प्रभाकर पणशीकरांच्या निधनानी लखोबा लोखंडे आणि शेहेनशहा औरंगजेबही आज पोरका झाला.
पंत तुम्ही आपल्या  खणखणीत आवाजात फक्त "तो मी नव्हेच!" जरी म्हणाला असतात तरी तो काळही   माघारी फिरला असता.