सोमवार, १६ ऑगस्ट, २०१०

'मनमोहना' तू राजा (स्वप्नातला).....

(राजकारण या अवघड विषयात शिरतो आहे. यावर भाष्य करायची माझी तशी योग्यता नाही पण कधी कधी बोलल्याशिवाय राहवत नाही.)

नुकताच देशभर ६४व्या स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी १५ ऑगस्ट, रविवार ला सलग सातव्या वर्षी लाल किल्ल्यावर तिंरगा ध्वज फडकावला. पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी याच्या पश्चात प्रथमच इतका काळ पंतप्रधान पदावर राहणारे (टिकणारे) नेते म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी गौरव प्राप्त केला.

या प्रसंगी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी माजी पंतप्रधान पंडीत नेहरू यांनी पाहिलेले 'विकसित भारताचे' स्वप्नं पूर्ण करू असे आश्वासन दिले.
'विकसित भारत' स्वातंत्र्याच्या ६३ वर्षांनी सुद्धा आपले पंतप्रधान भारताच्या पहिल्या पंतप्रधानांचे स्वप्नं पूर्ण करण्याचे आश्वासन देतात इतकी हास्यास्पद गोष्ट कदाचित फक्त आपल्या देशातच होवू शकेल. आश्वासनाच बरं असतं आपण बांधील राहत नाही, नंतर सांगता येतं कि आपल्याकडे अनेक समस्या आहेत त्याकडे आधी लक्ष देवूयात मग पुढे...अजून एक आश्वासन. डॉ. मनमोहन सिंग सध्या गाजत असलेल्या आणि महत्वपूर्ण अशा सर्व मुदयांना आपल्या भाषणात स्पर्श करतात, यात कुठेही ठोस निर्णय/योजना कसलाही समावेश नाही, का कुठल्याही प्रश्नावर थेट उपाय नाही.
'विकसित भारत' हे गाढ झोपेतले हवं हवंस वाटणारं सुंदर स्वप्नं आहे पण नियतीला अशी स्वप्नाची दुनिया मान्य नसते, लगेच सकाळ होते आणि आपण वास्तवाच्या दुनियेत येवून पोचतो. अशीच काहीशी त्यांची सुद्धा भाषण करताना मनस्थिती झाली असेल.

'विकसित भारत'-कशी करणार हो याची व्याख्या? आर्थिक स्वायत्ता/सुबत्ता, ओद्योगिक प्रगती याबरोबरच संरक्षण, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रांमधेही पूर्ण स्वायत्त भारत. थोडक्यात भारताचा सर्वंकष विकास. सध्याची परिस्थिती लक्षात घेता दुर्दैवाने पुन्हा आपण स्वप्नाच्या दुनियेत जातो. इथे इमारतीचा पायाच नाहीये आणि कळस कसा असेल? किती उंच असेल? याची चर्चा कशाला? आधी 'पाया'च बांधकाम पूर्ण करा, मग ते पक्कं आणि भक्कम आहे का त्याची तपासणी करा मगच 'कळसाचे' संकल्प चित्र, रचना, त्यावरची सजावट याचा विचार करूया.
माझ्या या म्हणण्यामागची वास्तविकता पंतप्रधानांच्या भाषणात दिसून येते ते म्हणतात "सगळ्यांच्या अन्न, पाणी, आरोग्य, आदी प्रमुख गरजा भागवण्यासाठी सरकार प्रामाणिक प्रयत्न करील. अकराव्या पंचवार्षिक योजनेत शिक्षण आणि आरोग्य सेवा यांच्या विकासाला महत्त्व देण्यात येईल, तसेच पायाभूत सुविधांच्या विकासालाही सरकार महत्त्व देणार असल्याचे" ते म्हणाले. गेली ६३ वर्षे आपण याच गोष्टी पुरवण्यासाठी देशाची तिजोरी रिकामी करत आहोत, याशिवाय अनेक आंतरराष्ट्रीय संस्था पाण्यासारखा निधी उपलब्ध करून देत आहेत, तरीही आजची परिस्थिती जैसे थे आहे, फिरून फिरून परत त्याच ठिकाणी येत आहोत जणू एखाद्या दुष्टचक्रात अडकल्याप्रमाणे. याचमुळे मला पुन्हाएकदा म्हणावसं वाटतं कि आपल्याकडे सरकारतर्फे घेण्यात आलेल्या निर्णयांची, योजनाची वास्तविकता आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी हे तपासणारी यंत्रणाच नाहीये कि जेणे करून आपण सरकारची क्रियाशीलता तपासून बघू शकू.

नागरिकांच्या कृपेनी सलग १० वर्ष राज्य करायची संधी काँग्रेसला मिळाली आहे आणि या सत्तारूपी दुधात साखर म्हणजे यंदा काँग्रेसला जवळजवळ बहुमत मिळालं आहे. देशहिताचे अनेक निर्णय या बहुमतामुळे सरकार घेवू शकेल. मात्र इकडे वेगळीच परिस्थिती पाहायला मिळते. हे सरकार एखाद्या निद्रिस्त अजगराप्रमाणे प्रमाणे आपापल्या खुर्च्यांना आणि मतदारसंघांना वेढा घालून बसले आहेत, सत्तेच्या भक्षाने सध्या ज्याचे पोट पूर्ण भरलेलं आहे, नुकत्याच पगारात आणि भत्यांमध्ये झालेल्या भरघोस वाढीमुळे ढेकरही देवून झाला आहे आणि पुढील निवडणुकांपर्यंत अजून काही खाद्य शोधायची गरजही नाहीये. यामुळेच शक्यतो वादात पडायचे नाही, आलेले दिवस घालवत राहायचे, लढायचेच नाही म्हणजे संघर्षाचा प्रश्नच येत नाही अशी काहीशी भूमिका सध्या दिसून येत आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर महागाई, राष्ट्रकुल स्पर्धा, काश्मीरमधील हिंसाचार, माओवादी, दहशतवादी यांच्या देशविघातक कारवाया यावर कुठेही किरकोळ अपवाद सोडले तर पंतप्रधानांनी भाष्य करणे जरुरीचे समजले नाही. याच मुद्यांवरून संसदेच्या सत्रामध्ये प्रचंड गोंधळ झाला पण संसदेतील चर्चेतही डॉक्टरांनी हस्तक्षेप केला नाही. एकदाचे सत्र संपले म्हणजे झालं असा एकूण पवित्रा दिसतो.

आपल्या भाषणात पंतप्रधान डॉ. सिंग यांनी जम्मू-काश्मिर आणि ईशान्य भारतातील सगळ्या राजकीय पक्षांना तसेच सरकारविरोधी आंदोलने करणा-या गटांना चर्चेचे जाहीर आमंत्रण दिले. नक्षलवाद्यांना देखिल हिंसा सोडून चर्चेच्या टेबलावर येण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच ते म्हणतात भारताला शेजारी देशांशी मैत्रीचे संबंध हवे आहेत. सीमेवर शांतता नांदावी, असे वाटत आहे. काही मतभेद असलेच तर ते चर्चेद्वारे सोडवायचे आहेत.
हे सगळे प्रश्न खरच चर्चेनी सुटणारे आहेत का? नुकत्याच पार पडलेल्या परराष्ट्रमंत्रांच्या चर्चेचे फलित काय होते? दोन्ही पक्षांनी एकमेकांवर (एकत्र पत्रकारांसमोर बसून) धूळफेक केली, आरोप-प्रत्यारोप झाले, हे कमी पडले म्हणून कि काय पुन्हा दोघांनी एकमेकांना चर्चेस बोलावले आणि झालं संपली चर्चा. 'चर्चा' या प्रकारच चांगलं आहे, लोकांना काहीतरी प्रयत्न चालू आहे असं वाटतं, पुन्हा चर्चेनंतर कोणी विचारत नाही कि काय निर्णय झाला. कालान्तरानी लोक विसरतात,प्रश्न जसाच्या तसा, त्यात काडीचा फरक नाही.

सध्याचे बाकी राजकारणी पहिले तर खरोखरच आपले भाग्य आहे कि आपल्याला पंतप्रधान म्हणून डॉ. सिंग यांसारखा उच्चशिक्षित अर्थतज्ञ मिळाला. मनात आणलं तर खरच आपलं परंपरागत स्वप्न "विकसित भारत" साकार होवू शकतं. मात्र सद्य परिस्थितीत डॉ. सिंग आपल्याच कुठल्यातरी स्वप्नात रंगलेले दिसतात (कदाचित शांततेचा नोबेल पुरस्कार?), पण मला हे सांगावसं हि सगळी स्वप्नाची दुनिया नाहीये (जिथे नोबेल सुद्धा जगातल्या सर्वात मोठं युद्ध पुकारणाऱ्यालाच मिळतं) , कि जिथे सगळे प्रश्न (उदा. दहशतवाद, नक्षलवाद ज्यात निष्पाप, सामान्य माणसं मारतानाही कुणी मागेपुढे पाहत नाही) फक्त चर्चेनी सोडवता येतील आणि चर्चा कुणाबरोबर तर ज्यांनी आजपर्यंत आपल्या बंधुभावांचे जीव घेतले त्याच्याबरोबर? हे कधीही न पटणारे आहे.

तात्पर्य मागची ६ वर्ष गेलेली असताना डॉक्टरांनी अजून प्रस्तावनाच न करता पुढील ४ वर्षे स्वप्नपूर्तीच्या दिशेने ठोस मार्गक्रमण करावे. भारतीयांचा विश्वास सार्थ ठरवून सध्या केवळ स्वप्नातच असणारा 'विकसित भारत' प्रत्यक्षात आणून सर्व जगाला दाखवून द्यावे कि हा स्वप्नातला राजा नसून स्वप्नं साकारणारा आहे.

गुरुवार, १२ ऑगस्ट, २०१०

॥ वन्दे मातरम ॥

बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी इ.स. १८८२ मध्ये प्रकाशित केलेल्या त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये 'वन्दे मातरम' हे गीत लिहिले होते. भारताच्या इतिहासात 'वन्दे मातरम' चे एक विशेष स्थान आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांची सत्ता उलथून टाकण्याच्या एकाच ध्येयांनी भारून गेलेल्या स्वातंत्र्य सैनिकांसाठी 'वन्दे मातरम' हे प्रेरणागीत होते.
हि रचना बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी इ.स. १८७६ ला केली होती, पण आनंदमठ या पुस्तकातून 'वन्दे मातरम' पहिल्यांदा प्रकाशित झालं.

वन्दे मातरम स्वातंत्र्य संग्रामातील मुख्य ब्रीद होते, ज्याच्या केवळ उच्चारानी स्वातंत्र्याची भावना अधिक तीव्र होत असे. अनेक मोर्चे, प्रभात फेऱ्या यातून हे गीत गायले जावू लागले. लोकांमध्ये 'वन्दे मातरम' चा इतका प्रभाव होता कि इंग्रजांनी दूरगामी धोका लक्षात घेवून 'वन्दे मातरम' च्या सार्वजनिक घोषणेवर काहीकाळ बंदी आणली होती.

या गीतावरून ते लिहिल्यापासून ते अगदी २००६ पर्यंत अनेक वेळा वाद झाले. स्वातंत्र्यपूर्वीपासून ते अगदी आजपर्यंत आपल्या राजकारण्यांनी आपल्या संकुचित फायद्यासाठी आणि मतांच्या राजकारणासाठी अनेक गोष्टींचे तुकडे केले, यात या प्रेरक गीताचे देखील तुकडे केले गेले.

भारत स्वतंत्र झाल्यावर भारतीय संविधानानी या 'वन्दे मातरम'च्या पहिल्या कडव्यास "राष्ट्रीयगान" असा दर्जा दिला आणि रवींद्रनाथ टागोर लिखित "जन गण मन" हे आपले राष्ट्रगीत झाले.

याच्या स्मरणार्थ आणि येणाऱ्या ६३व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानी संपूर्ण 'वन्दे मातरम' याठिकाणी प्रदर्शित करतो आहे.

वन्दे मातरम्

सुजलां सुफलां मलयजशीतलाम्
शस्यशामलां मातरम् ।
शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीं
फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीं
सुहासिनीं सुमधुर भाषिणीं
सुखदां वरदां मातरम् ।। १ ।। वन्दे मातरम् ।

कोटि-कोटि-कण्ठ-कल-कल-निनाद-कराले
कोटि-कोटि-भुजैर्धृत-खरकरवाले,
अबला केन मा एत बले ।
बहुबलधारिणीं नमामि तारिणीं
रिपुदलवारिणीं मातरम् ।। २ ।। वन्दे मातरम् ।

तुमि विद्या, तुमि धर्म
तुमि हृदि, तुमि मर्म
त्वं हि प्राणा: शरीरे
बाहुते तुमि मा शक्ति,
हृदये तुमि मा भक्ति,
तोमारई प्रतिमा गडि
मन्दिरे-मन्दिरे मातरम् ।। ३ ।। वन्दे मातरम् ।

त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी
कमला कमलदलविहारिणी
वाणी विद्यादायिनी, नमामि त्वाम्
नमामि कमलां अमलां अतुलां
सुजलां सुफलां मातरम् ।। ४ ।। वन्दे मातरम् ।

श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां
धरणीं भरणीं मातरम् ।। ५ ।। वन्दे मातरम् ।।

रविवार, ८ ऑगस्ट, २०१०

"आंधळा राजा आणि मूर्ख प्रजा"

माझा आणि सरकारी कचेऱ्यांचा संबंध जरा कमीच आहे. तसा अजिबातच नाहीये. असं म्हणा ना कि मी तिकडे जाणं टाळतो. पण मध्यंतरी "Power of Attorney" साठी माझ्या दुर्दैवानं तिकडे जाण्याच्या योग आला. बरेच वेळा या ठिकाणी तुमचा सोबती एखादा वकील किंवा एजंट असतो.

आदल्या दिवशी मी वकिलाला भेटून कागद पत्रांची पूर्तता केली होतीच. "उद्या सकाळी ९ वाजता या घरी मग इथूनच निघू आपण हवेलीला" वकील साहेब. 'हवेली'? या प्रकारच्या सरकारी कचेरीला 'हवेली' म्हणतात हे मला पहिल्यांदाच कळलं. अश्या बऱ्याच 'हवेली' आहेत हे सुद्धा कळलं. आम्हाला आंबेगाव च्या हवेलीला भेट द्यायची होती.

दुसऱ्या दिवशी बरोबर ९ वाजता मी आणि माझा भाऊ वकिलाच्या घरी पोचलो आणि तिथून आम्ही हवेली कडे मोर्चा वळवला. वकिलांनी आधीच कुणाला तरी मोबाईल वरून नंबर लावायला सांगितला होता.(निंदेच्या सोयीसाठी त्याला आपण राजू म्हणूया). ह्या वकिलांचे अशा सरकारी हवेलीमध्ये म्हणा किंवा कचेरीमध्ये म्हणा या राजुसारखे कुणी ना कुणीतरी नेमलेले असते. त्या लोकांना कार्यालयाच्या पद्धतीची, आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती असते. इतकेच काय तिथे काम करणाऱ्यांची सुद्धा इत्यंभूत माहिती असते आणि विशेष म्हणजे हे लोक बिनदिक्कत पणे आतील "प्रवेश बंद" ठिकाणी फिरताना दिसतात. हे लोक कमिशन एजंट असतात, पण यात आपला फायदा असा कि सकाळी सकाळी जावून नंबर लावायला नको आणि एकदा नंबर लावला कि आपला काम लवकर होतं. (आपलं काम लवकर होतं हा माझा भ्रम होता हे लवकरच मला कळलं)

शेवटी आम्ही एकदाचे त्या 'हवेली'ला पोचलो. त्या कचेरीचं नावच फक्त 'हवेली' होतं बाकी 'हवेली' (टीव्ही वरच्या मालिका सिनेमा यात दिसणाऱ्या) आणि त्या जागेचा काहीही संबंध नव्हता. इथे 'हवेली' म्हणजे सिमेंट चे पत्रे असलेली झोपडीवजा खोली होती. बाहेर फक्त कामाचे आकारले जाणारे पैसे लिहिले होते. कुठेही कामाची पद्धत, आवश्यक कागदपत्र, फोर्म भरण्या संदर्भात माहिती नव्हती. थोडक्यात राजू एजंट हाच आमच्या आणि सरकारी कामकाजातील सर्वज्ञात दुवा होता. त्या अंधाऱ्या खोलीमध्ये फारच कुबट वातावरण होतं (कुबटच म्हणतात ना हो त्याला कि जिथे गेल्यावर एकदम नकोसं होतं बाहेर पडावस वाटत), आतमध्ये बऱ्याच लोकांची गर्दी होती, कुणीतरी लोकांच्या नावाने बोलावत होते (बोलावणारे लोक बहुदा एजंट असावेत). टेबलामागे बरीच लोक बसलेली होती, त्यापैकी काही लोक काहीच काम करत नव्हते असं मला प्रथमदर्शनी वाटलं (हा माझा अजून एक गैरसमज होता). नंतर नीट पाहिल्यावर कळला की ती लोकं फारच 'महत्वाची'? कामं करत होती. त्यापैकी एक जण फक्त कसले तरी शिक्के मारत होता, एक महिला आलेले फोर्म अनुक्रमानी लावत होती (हा क्रम तीच इतर एजंट बरोबर काहीतरी बोलून लावत होती). या सगळ्या प्रकारात कुठेही ज्यांचं काम आहे त्यातल्या कुणाचाही संबंध नव्हता. सगळा कारभार फारच गोंधळात टाकणारा आणि कुठल्याही पद्धतीत न बसणारा होता. (भ्रष्टाचाराचा उल्लेख मी जाणून बुजून या ठिकाणी टाळला आहे पण त्याचं अस्तित्व आहेच हे गृहीत धरावं).

ह्या सगळ्या गोंधळातून, त्यांच्या जेवायच्या, चहापाण्याच्या आणि इतर विश्रांतीतून आमचे काम संध्याकाळी ६.३० वा. पार पडले आणि ते पॉवर ऑफ अतोर्नी चे कागद माझ्या हातात आले. तसा पहिला तर हा दोन नागरीकांमाधला वैयक्तिक करार आहे आणि तो सरकारी अधिकार्यांसमोर रजिस्टर केला जातो. सध्या आधुनिक तंत्रज्ञान, संगणक याचा वापर होवूनही या कामांसाठी लागणारा वेळ आणि पैसा काही कमी होताना दिसत नाही. सरकारी कर्मचारी 'आपलं घरच काम थोडीच आहे' या भावनेनी कामं करीत राहतात आणि सामान्य नागरिक काही विचार न करता जे चालू आहे त्याचा अनुकरण करतात........

(या अनुभवामुळे मात्र मध्यंतरी वाचलेली सुधा मूर्तींची एक गोष्ट सारखी डोक्यात यायला लागली.)

एका गावात मनुकुमार नावाचा राजा असतो. राजा तसा फार हुशार मात्र आळस, विलासी वृत्ती, आणि भरपूर अहंभाव यामुळे त्याचे राज्यकारभारात अजिबात लक्ष नसते. त्याच्या राज्यात सगळा कारभार हा भ्रष्ट आणि मुजोर मंत्र्यांच्या हातात असतो. अर्थातच भ्रष्टाचार, लबाडी, दहशतीची राज्यात कुठेही कमतरता नसते. या गावात एक नरहरी नावाचा हुशार आणि सरळ मार्गी चालणारा माणूस असतो. याचमुळे त्याच्याकडे कुठलाही काम नसतं.

एक दिवस तो शक्कल लढवतो आणि एका सरकारी कार्यालासमोर दरवाज्यात एक शिक्का घेवून बसतो. कार्यालयाबाहेर बरीच मोठी रांग असते त्यातील पहिल्या माणसाच्या अर्जावर शिक्का मारतो. मग सगळेच लोक शिक्का मारून घेतात, काही जण तर त्याला पैसे सुद्धा देतात. कोणीही विचार करत नाही कि कसला शिक्का आहे त्यावर काय आहे? यथावकाश तो शिक्का कामकाजाचा एक भाग होतो आणि सर्व लोक त्याला शिक्का मारल्यावर पैसे देवू लागतात. नरहरीची युक्ती बरोबर लागू पडते, नरहरी चा संसार कसल्याही विवंचने वाचून सुरु होतो, गाठीला पैसे आणि काम दोन्हीही आलेले असते.
कालांतराने तो शिक्का इतका महत्वाचा होतो कि एखादा दिवस नरहरी आजारी पडला तर कार्यालयाचा कामकाज थांबतं. कर्मचारी सुद्धा अर्ज शिक्का नाही म्हणून परत पाठवत.

एक दिवस राजदरबारातील कुणाचंतरी काम असतं आणि नेमका त्यादिवशी नरहरी आजारी असतो. अर्थातच शिक्का नाही त्यामुळे त्या माणसाचा काम होत नाही. तो राजाकडे हि बातमी पोचवतो कि "शिक्का नसल्यामुळे अर्ज स्वीकारला गेला नाही आणि काम होवू शकलं नाही". राजाही कळेना कि हा कुठल्या शिक्क्याबद्दल सांगत आहे? राजा ह्या प्रकारची चौकशी करायची आज्ञा देतो, सेवक चौकशीअंती नरहरीला दरबारात हजर करतात. नरहरी आपली बाजू मांडतो कि त्यांनी कुणालाही बळजबरी केली नाही, तो फक्त तिथे शिक्का मारायचा पण नंतर लोकच आवर्जून शिक्का घेवू लागले आणि पैसे देवू लागले.

राजानी विचारलं कि शिक्क्यावर काय लिहिला आहे? नरहरीने घाबरत घाबरत शिक्का दाखवला त्यावर वेड्यावाकड्या अक्षरात लिहिला होतं "आंधळा राजा आणि मूर्ख प्रजा".
राजाला क्षणात आपली चूक कळाली, आपले कारभारात लक्ष नाही हे उमगलं. राजानी हे सगळं बदलायचा निर्णय घेतला. पुढे तो एक यशस्वी राजा म्हणून प्रसिद्ध झाला. नरहरीला दरबारात नोकरी दिली, तो शिक्का मात्र तसाच वापरला जावू लागला पण त्याचं उपयोग राजानी करवसुलीसाठी केला. शिक्का फक्त बदललेला होता "सुज्ञ राजा मनुकुमार: प्रजा कल्याणार्थ कर"!

वरील कथा अतिशय मार्मिक आहे आणि सध्याच्या आपल्या राज्यकर्त्यांच्या कारभाराशी खूपच मिळती जुळती आहे. देशात पैश्याची कमतरता आहे असं आपण देवस्थानात येणारा निधी, चित्रपटांच वाढणारं बजेट, IPL चा बाजार याकडे बघून अजिबातच म्हणू शकत नाही. जनतेसाठी सुरु केलेल्या योजना वास्तवात त्यांच्या पर्यंत पोहोचतात का नाही हे पाहणारी यंत्रणाच आपल्या इथे नाही.
यासारख्या अनेक कारणांमुळे आणि अंध राज्यकर्त्यांमुळे सध्या भ्रष्टाचार, महागाई, रोगराई याचा मुक्त संचार दिसतो आहे. शेतकरी आत्महत्या करतात, गरीब अजून गरीब होत आहेत, मंत्री अजून श्रीमंत होत आहेत. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपण सुद्धा हे सगळं फारसा काही विरोध न करता सहन करत आहोत, जणू काही हेच आपला दैव आहे.


थोडक्यात काय तर "आंधळा राजा आणि मूर्ख प्रजा"