रविवार, १३ फेब्रुवारी, २०११

अडीचशे वर्षांचा लकडी पुल


पुणेकरांच्या गेल्या दहा पिढ्यांना ज्याने मुठेच्या एका तीरावरून दुसऱ्या तीरावर पोचवले, त्या लकड़ीपुलाच्या उभारणीस आज अडीचशे वर्षे पूर्ण होत आहेत. पानिपतावरून आलेले सैन्य शहरात येण्यासाठी याची उभारणी केली गेली, अशी या संदर्भात आख्यायिका आहे. १७६१ मध्ये वैशाख महिन्यात बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांनी लकडी पुलाचे काम सुरु केले. ते स्वतः या कामावर रोज जावुन पाहुन येत.
तीस दिवसांत हा पूल बांधला गेला, त्यानंतर अल्पावधीतच नानासाहेबांचे पर्वतीवर २३ जून १७६१ रोजी निधन झाले. त्यांना पुलानजीकच अग्नी देण्यात आला. त्यानंतर काही काळातच नारायणराव पेशवे यांचाही पुलानजीक अंत्यवीधी करण्यात आला. या घटनांप्रमाणेच पुलानजीक सावरकरांनी केलेली विदेशी कपड्यांची होळी, १८९३ पासून दरवर्षी येणारी अनंतचतुर्दशीची मिरवणुक व पुर्वीच्या काळात त्यानंतर होणार्या सांगता सभा, पावसाळ्यात मुठेचे दुथडी भरुन वाहणारे, पुलापर्यंत येणारे पाणी, १९५८ चा मोठा पूर व पानशेतचा प्रलय अशा अनेक घटनांचा हा पुल साक्षीदार आहे.

१७६१ मधे लाकडामध्ये बांधलेला हा पूल १८४० मध्ये आलेल्या पुरात मोडला व याच जागी पक्का पूल  बांधण्यात आला. यासाठी ४७ हजार रुपये खर्च झाला. या पैकी ११ हजार रुपये ब्रिटीशांनी पुणेकरांकदुन वसुल केले. तेव्हा हा पूल १८ फुट रुंदीचा बांधण्यात आला होता व रेल्वे सुरु होण्यापुर्वी मुंबईला जाण्यासाठी हाच मार्ग असल्याने येथे मोठी रहदारी असे. पूढे येथिल रहदारीस पूल अपुरा पडु लागल्याने १९२८ मध्ये पुलाची रुंदी ३७ फु करण्यात आली. या कामास ४०००० रुपये खर्च झाला. परंतु कालांतराने हे रुंदीकरणही अपुरे पडु लागले व पुन्हा एकदा १९५० मध्ये रुंदीकरणाचे  हाती घेण्यात आले. दिड वर्ष रोज २०० मजूरांनी काम करुन पूल ७६ फूट रुंद केला. १९५२ मध्ये जून महिन्यात हे काम पुर्ण होवुन त्याचे उद्घाटन झाले.याच काळात लकडीपुलाचे संभाजीपुल असे नामकरण करण्यात आले            

पुलाच्या रुंदीकरणाने १९४८ पर्यंत स्मशान असलेला भागही बदलुन गेला, लकडी पुल हा पुर्वापार पुणेकरांच्या जिव्हळ्याचा विषय राहिला आहे. लकडी पुलावर उभे राहुन मुठेच्या पूरात उड्या मारणे, हा प्रतीवर्षीचा उपक्रम. १३ जूलै १९६१ ला पुणेकरांनी पुलावर अशीच गर्दी केली होती, पण काहिकाळातच त्यांच्या लक्षात आलं की हा नेहमीचा पूर नाही.या पूरामुळे लकडी पुलाचे मोठे नुकसान झाले व पुढे ८ दिवस सैनिकांनी पादचारी व सायकलस्वार यांच्यासाठी पर्यायी पूल सुरु केला.
१७६१ पासुन १९२३ पर्यंत म्हण्जे १६२ वर्ष पुणे शहरात हा एकच पूल होता, पुढे १९२३ साली शनिवारवाड्यासमोरील पुलाचे काम पूर्ण झाले, आज पुण्यात मुठानदीवर १५ पूल आहेत. पण पुणेकरांच्या मनात व पुण्याच्या इतिहासात लकडी पुलास मानाचे स्थान आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
सौ: सकाळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा