बुधवार, २ मार्च, २०११

पनोती

नेहमीप्रमाणे मी ईंटरसिटी एक्स्प्रेसनी मुंबईला निघालो होतो. आजुबाजुच्या सहप्रवाश्यांकडे किरकोळ नजर फिरवण्याचा कार्यक्रम झाला. उल्लेखनीय चेहेरा न दिसल्यानेच बहुधा आपोआपच मला झोप लागली असावी. तशीही मला प्रवासात झोप येण्यासाठी फारसे कष्ट कधी घ्यावे लागत नाहित,काही वेळाच्या गाढ झोपेनंतर साधारणतः लोणावळ्यानंतर मला जाग आली. IRCTC चा 'मसाला चाय....' घेतला. मग मी येणाऱ्या जाणाऱ्या विक्रेत्यांकडे पहात वेळ्काढूपणा करत होतो. प्रथम एक पुस्तकवाला येवुन गेला, मग एक मॅजिक बुक वाला चक्कर टाकुन गेला, चिक्की वाले, जेली वाले आणि कट्लेट आम्लेट तर सारखीच ये-जा करत होता इतके कि त्यांची आता कटकट होत होती.

काही वेळानी एक बारकासा पोरगा आला, खाकी डगला, हाप चड्डी, खाद्यावर एक छोटी पिशवी. ऍटीतच त्यानी पहिल्या रांगेतल्या खिडकीच्या वरच्या मोकळ्या जागेत एक प्लॅस्टीकचा स्पायडरमॅन टाकला आणि मोठ्या अभिमानाने आरोळी ठोकली " चला स्पायडरमॅन, चलता फिरता स्पायडरमॅन, बच्चो को खेलने के लिये, गिफ्ट केलीये......"
हा स्पायडरमॅन भिंती वर टाकला कि आपोआप उलटा पालट होत हळूहळू खाली येवू लागतो, दिसायला छान वाटतं. लहान मुले लगेच आई वडिलांकडे ह्या स्पायडरमॅन ची मागणी करतात. (स्पायडरमॅन च्या हाता- पायाला एक चिकट पदार्थ लावलेला असतो ज्यामुळे तो असं भिंतीवरून आपोआप खाली येतो)  
पण आज त्या मुलांनी खिडकीच्या वर टाकलेला स्पायडरमॅन काही खाली आलाच नाही, एक नजर त्या चिकटलेल्या स्पायडरमॅन वर टाकत ह्या मुलाची आरोळी मात्र न थांबता चालूच होती. काही काळाने मात्र तो वैतागला आणि तो स्पायडरमॅन काढून मागे दरवाजा असतो त्या मोकळ्या जागेत गेला, तेथे त्यांनी तो स्पायडरमॅन एका दरवाज्यावर टाकला, अपेक्षित पणे तो कोलांट्या उड्या मारत खाली खाली येवू लागला. पोराच्या चेहेऱ्यावर एक विजयी समाधान दिसले, त्याने तीन चार वेळा त्या स्पायडरमॅन ची पूर्व परीक्षा घेतली आणि पुन्हा तो डब्यात आला, तितक्याच उत्साहात त्याने पुन्हा तो स्पायडरमॅन खिडकी वरील मोकळ्या जागेत फेकला आणि नेहमीची आरोळी ठोकली. पुन्हा तीच तऱ्हा स्पायडरमॅनच आज काहीतरी बिनसलं होता, इतके वेळा चाचणी घेवून देखील ऐन परीक्षेत गडी नापास होत होता, थोडक्यात भरवश्याच्या म्हशीला टोणगा. अगदी स्पष्टच सांगायचा तर आपल्या भारतीय क्रिकेट टीम सारखं. आणि कुठलीही हालचाल न केल्यामुळे स्पायडरमॅनला कुणीही विकतच काय पण बघायला हि घेत नव्हता.

मुलाच्या चेहेऱ्यावर काहीसा राग स्पष्ट दिसत होता, पण त्याने पुन्हा मागे जावून काही काळ स्पायडरमॅन ची परीक्षा घेण्यात घालवला, 'इधर बराबर से नीचे आ रहा है साला! ' असं काहीसं माझ्या कानावर पडलं, बाजूच्या एका त्याच्याच वयाच्या चिक्की विक्रेत्याला तो सांगत होता.
काही काळ असाच स्पायडरमॅनची परीक्षा घेण्यात आणि त्याला शिव्या देण्यात गेला. तो आता वेगळ्याच निर्धाराने पुन्हा डब्यात प्रवेशाला, पूर्वीपेक्षा खणखणीत  आरोळी दिली " चला स्पायडरमॅन, चलता फिरता स्पायडरमॅन, बच्चो को खेलने के लिये, गिफ्ट केलीये......" न बघताच त्याने स्पायडरमॅन पुन्हा फेकला याही वेळी स्पायडरमॅननी अपेक्षित हालचाली केल्या नाहीत तसाच चिकटून राहिला. त्यांनी तो घट्ट चिकटलेला स्पायडरमॅन काढला आणि तश्याच आरोळ्या देत तो पुढे चालत राहिला. कोण विकत घेतोय नाही घेत त्याला काहीही सोयर सुतक नव्हतं, कुठेही निराशा नव्हती, दु:ख नव्हते, जिद्द मात्र प्रकर्षानी जाणवत होती. कदाचित याचमुळे एक दोघांनी पुढे पहिले आणि विकतही घेतले. त्या आपल्या नायकाकडे मी बराच वेळ पाहत होतो, असाच काही वेळ निघून गेला, मागून पुन्हा त्याच मुलाचा आवाज पुन्हा येवू लागला, "मॅजिक बुक लेलो.............मॅजिक बुक". मी चमकून मागे पहिला तर तोच मुलगा, पूर्वीपेक्षाही अधिक उत्साहानी हा नवीन (उसना) धंदा जोरात करत होता. माझ्या जवळ येताच म्हणालो " अरे वो स्पायडरमॅन  को पुरी धूल लगी थी, इसलिये नीचे नाही आ रहा, जरा दुसरे से ट्राइ करो", तो काही क्षण वाया न घालवता म्हणाला "मैने हि लगाई थी धूल, नही तो सिधा नीचे गिरता है!......  कूच नही साब ये गाडी हि पंनोती है, सिंहगड मी १०००-१००० रुपये का धंदा है....क्या बिकता है ये स्पायडरमॅन.......पनोती है क्या कर सकता है .........."

आयुष्यातल्या एका अडथळ्याला, शुल्लक पणे 'पनोती' ठरवून त्याने तो सहज पार करून टाकला होता, आणि एवढ्यावरच न थांबता.......तो तसाच पुढे चालत होता........आपण मात्र त्याच त्या अडथळ्या भोवती   घुटमळत राहतो.....आणि मग काय ..... प्रवासच खुंटतो!  

२ टिप्पण्या: