रविवार, ८ ऑगस्ट, २०१०

"आंधळा राजा आणि मूर्ख प्रजा"

माझा आणि सरकारी कचेऱ्यांचा संबंध जरा कमीच आहे. तसा अजिबातच नाहीये. असं म्हणा ना कि मी तिकडे जाणं टाळतो. पण मध्यंतरी "Power of Attorney" साठी माझ्या दुर्दैवानं तिकडे जाण्याच्या योग आला. बरेच वेळा या ठिकाणी तुमचा सोबती एखादा वकील किंवा एजंट असतो.

आदल्या दिवशी मी वकिलाला भेटून कागद पत्रांची पूर्तता केली होतीच. "उद्या सकाळी ९ वाजता या घरी मग इथूनच निघू आपण हवेलीला" वकील साहेब. 'हवेली'? या प्रकारच्या सरकारी कचेरीला 'हवेली' म्हणतात हे मला पहिल्यांदाच कळलं. अश्या बऱ्याच 'हवेली' आहेत हे सुद्धा कळलं. आम्हाला आंबेगाव च्या हवेलीला भेट द्यायची होती.

दुसऱ्या दिवशी बरोबर ९ वाजता मी आणि माझा भाऊ वकिलाच्या घरी पोचलो आणि तिथून आम्ही हवेली कडे मोर्चा वळवला. वकिलांनी आधीच कुणाला तरी मोबाईल वरून नंबर लावायला सांगितला होता.(निंदेच्या सोयीसाठी त्याला आपण राजू म्हणूया). ह्या वकिलांचे अशा सरकारी हवेलीमध्ये म्हणा किंवा कचेरीमध्ये म्हणा या राजुसारखे कुणी ना कुणीतरी नेमलेले असते. त्या लोकांना कार्यालयाच्या पद्धतीची, आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती असते. इतकेच काय तिथे काम करणाऱ्यांची सुद्धा इत्यंभूत माहिती असते आणि विशेष म्हणजे हे लोक बिनदिक्कत पणे आतील "प्रवेश बंद" ठिकाणी फिरताना दिसतात. हे लोक कमिशन एजंट असतात, पण यात आपला फायदा असा कि सकाळी सकाळी जावून नंबर लावायला नको आणि एकदा नंबर लावला कि आपला काम लवकर होतं. (आपलं काम लवकर होतं हा माझा भ्रम होता हे लवकरच मला कळलं)

शेवटी आम्ही एकदाचे त्या 'हवेली'ला पोचलो. त्या कचेरीचं नावच फक्त 'हवेली' होतं बाकी 'हवेली' (टीव्ही वरच्या मालिका सिनेमा यात दिसणाऱ्या) आणि त्या जागेचा काहीही संबंध नव्हता. इथे 'हवेली' म्हणजे सिमेंट चे पत्रे असलेली झोपडीवजा खोली होती. बाहेर फक्त कामाचे आकारले जाणारे पैसे लिहिले होते. कुठेही कामाची पद्धत, आवश्यक कागदपत्र, फोर्म भरण्या संदर्भात माहिती नव्हती. थोडक्यात राजू एजंट हाच आमच्या आणि सरकारी कामकाजातील सर्वज्ञात दुवा होता. त्या अंधाऱ्या खोलीमध्ये फारच कुबट वातावरण होतं (कुबटच म्हणतात ना हो त्याला कि जिथे गेल्यावर एकदम नकोसं होतं बाहेर पडावस वाटत), आतमध्ये बऱ्याच लोकांची गर्दी होती, कुणीतरी लोकांच्या नावाने बोलावत होते (बोलावणारे लोक बहुदा एजंट असावेत). टेबलामागे बरीच लोक बसलेली होती, त्यापैकी काही लोक काहीच काम करत नव्हते असं मला प्रथमदर्शनी वाटलं (हा माझा अजून एक गैरसमज होता). नंतर नीट पाहिल्यावर कळला की ती लोकं फारच 'महत्वाची'? कामं करत होती. त्यापैकी एक जण फक्त कसले तरी शिक्के मारत होता, एक महिला आलेले फोर्म अनुक्रमानी लावत होती (हा क्रम तीच इतर एजंट बरोबर काहीतरी बोलून लावत होती). या सगळ्या प्रकारात कुठेही ज्यांचं काम आहे त्यातल्या कुणाचाही संबंध नव्हता. सगळा कारभार फारच गोंधळात टाकणारा आणि कुठल्याही पद्धतीत न बसणारा होता. (भ्रष्टाचाराचा उल्लेख मी जाणून बुजून या ठिकाणी टाळला आहे पण त्याचं अस्तित्व आहेच हे गृहीत धरावं).

ह्या सगळ्या गोंधळातून, त्यांच्या जेवायच्या, चहापाण्याच्या आणि इतर विश्रांतीतून आमचे काम संध्याकाळी ६.३० वा. पार पडले आणि ते पॉवर ऑफ अतोर्नी चे कागद माझ्या हातात आले. तसा पहिला तर हा दोन नागरीकांमाधला वैयक्तिक करार आहे आणि तो सरकारी अधिकार्यांसमोर रजिस्टर केला जातो. सध्या आधुनिक तंत्रज्ञान, संगणक याचा वापर होवूनही या कामांसाठी लागणारा वेळ आणि पैसा काही कमी होताना दिसत नाही. सरकारी कर्मचारी 'आपलं घरच काम थोडीच आहे' या भावनेनी कामं करीत राहतात आणि सामान्य नागरिक काही विचार न करता जे चालू आहे त्याचा अनुकरण करतात........

(या अनुभवामुळे मात्र मध्यंतरी वाचलेली सुधा मूर्तींची एक गोष्ट सारखी डोक्यात यायला लागली.)

एका गावात मनुकुमार नावाचा राजा असतो. राजा तसा फार हुशार मात्र आळस, विलासी वृत्ती, आणि भरपूर अहंभाव यामुळे त्याचे राज्यकारभारात अजिबात लक्ष नसते. त्याच्या राज्यात सगळा कारभार हा भ्रष्ट आणि मुजोर मंत्र्यांच्या हातात असतो. अर्थातच भ्रष्टाचार, लबाडी, दहशतीची राज्यात कुठेही कमतरता नसते. या गावात एक नरहरी नावाचा हुशार आणि सरळ मार्गी चालणारा माणूस असतो. याचमुळे त्याच्याकडे कुठलाही काम नसतं.

एक दिवस तो शक्कल लढवतो आणि एका सरकारी कार्यालासमोर दरवाज्यात एक शिक्का घेवून बसतो. कार्यालयाबाहेर बरीच मोठी रांग असते त्यातील पहिल्या माणसाच्या अर्जावर शिक्का मारतो. मग सगळेच लोक शिक्का मारून घेतात, काही जण तर त्याला पैसे सुद्धा देतात. कोणीही विचार करत नाही कि कसला शिक्का आहे त्यावर काय आहे? यथावकाश तो शिक्का कामकाजाचा एक भाग होतो आणि सर्व लोक त्याला शिक्का मारल्यावर पैसे देवू लागतात. नरहरीची युक्ती बरोबर लागू पडते, नरहरी चा संसार कसल्याही विवंचने वाचून सुरु होतो, गाठीला पैसे आणि काम दोन्हीही आलेले असते.
कालांतराने तो शिक्का इतका महत्वाचा होतो कि एखादा दिवस नरहरी आजारी पडला तर कार्यालयाचा कामकाज थांबतं. कर्मचारी सुद्धा अर्ज शिक्का नाही म्हणून परत पाठवत.

एक दिवस राजदरबारातील कुणाचंतरी काम असतं आणि नेमका त्यादिवशी नरहरी आजारी असतो. अर्थातच शिक्का नाही त्यामुळे त्या माणसाचा काम होत नाही. तो राजाकडे हि बातमी पोचवतो कि "शिक्का नसल्यामुळे अर्ज स्वीकारला गेला नाही आणि काम होवू शकलं नाही". राजाही कळेना कि हा कुठल्या शिक्क्याबद्दल सांगत आहे? राजा ह्या प्रकारची चौकशी करायची आज्ञा देतो, सेवक चौकशीअंती नरहरीला दरबारात हजर करतात. नरहरी आपली बाजू मांडतो कि त्यांनी कुणालाही बळजबरी केली नाही, तो फक्त तिथे शिक्का मारायचा पण नंतर लोकच आवर्जून शिक्का घेवू लागले आणि पैसे देवू लागले.

राजानी विचारलं कि शिक्क्यावर काय लिहिला आहे? नरहरीने घाबरत घाबरत शिक्का दाखवला त्यावर वेड्यावाकड्या अक्षरात लिहिला होतं "आंधळा राजा आणि मूर्ख प्रजा".
राजाला क्षणात आपली चूक कळाली, आपले कारभारात लक्ष नाही हे उमगलं. राजानी हे सगळं बदलायचा निर्णय घेतला. पुढे तो एक यशस्वी राजा म्हणून प्रसिद्ध झाला. नरहरीला दरबारात नोकरी दिली, तो शिक्का मात्र तसाच वापरला जावू लागला पण त्याचं उपयोग राजानी करवसुलीसाठी केला. शिक्का फक्त बदललेला होता "सुज्ञ राजा मनुकुमार: प्रजा कल्याणार्थ कर"!

वरील कथा अतिशय मार्मिक आहे आणि सध्याच्या आपल्या राज्यकर्त्यांच्या कारभाराशी खूपच मिळती जुळती आहे. देशात पैश्याची कमतरता आहे असं आपण देवस्थानात येणारा निधी, चित्रपटांच वाढणारं बजेट, IPL चा बाजार याकडे बघून अजिबातच म्हणू शकत नाही. जनतेसाठी सुरु केलेल्या योजना वास्तवात त्यांच्या पर्यंत पोहोचतात का नाही हे पाहणारी यंत्रणाच आपल्या इथे नाही.
यासारख्या अनेक कारणांमुळे आणि अंध राज्यकर्त्यांमुळे सध्या भ्रष्टाचार, महागाई, रोगराई याचा मुक्त संचार दिसतो आहे. शेतकरी आत्महत्या करतात, गरीब अजून गरीब होत आहेत, मंत्री अजून श्रीमंत होत आहेत. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपण सुद्धा हे सगळं फारसा काही विरोध न करता सहन करत आहोत, जणू काही हेच आपला दैव आहे.


थोडक्यात काय तर "आंधळा राजा आणि मूर्ख प्रजा"

५ टिप्पण्या:

  1. वा साहेब..
    ब्लॉगविश्वामध्ये आपलं स्वागत आहे...
    मस्त जमला आहे लेख..लिहिते राहा...

    उत्तर द्याहटवा
  2. aj सुरेख लेख
    असाच अनुभव मलाही आला जेव्हा मी दोन महिन्यापूर्वी माझ्या नवीन घराची नोंदणी करण्यासाठी सरकारी कचेरीत गेलो होतो तेव्हा. सकाळी नऊ वाजल्यापासून ४ वाजेपर्यंत बाकावर बसून मी आजूबाजूच्या परिस्थितीचा अभ्यास करत होतो ... पण कशाचा कशाला पत्ता लागत नव्हता. साहेबांच्या टेबलावर ठेवलेली माझी फाईल कधी वरती जायची तर कधी खाली ..... म्हणजे माझा नक्की नंबर कोणता हे कळायला काही मार्ग नव्हता. सरतेशेवटी ४ वाजता कसातरी कार्यक्रम पार पाडला. पण राहून राहून मनात हेच विचार येत होते कि आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय.

    तुमच्या पुढच्या लिखाणासाठी माझ्या शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  3. पोगो, आपल्या प्रतिक्रीयेबद्दल मनःपुर्वक आभार.
    खरच अगदी कशाचा कशाला पत्ता लागत नाही त्या ठिकाणी आणि आपण हताश होतो.

    उत्तर द्याहटवा
  4. "आंधळा राजा आणि मूर्ख प्रजा"
    ek no.

    उत्तर द्याहटवा