रविवार, १२ डिसेंबर, २०१०

त्याचं काय चुकलं?

गावाच्या स्मशानात भयाण शांतता पसरली होती, गावकऱ्यांची कुजबुज पेटत्या चितांच्या आवाजात विरून जात होती. स्मशानातल्या मूळच्या उदास आणि उजाड वातावरणात सायंकाळच्या संधीप्रकाशानी कुबटपणाचीही भर पडली होती. समोर पेटलेल्या चितांच्या धुरानी सारा आसमंत झाकोळून गेला होता.
भीमा निर्विकार चेहऱ्यानी बापाच्या पेटत्या चीतेकडे एकटक पाहत होता. मनात विचारांचं काहूर माजलं होतं, धाकटी बहिण, विधवा आईचा चेहेरा नजरे समोरून हलत नव्हता.

भीमा ला कसलीच जाणीव होत नव्हती, फिरून फिरून एकच विचार मनात येत होतं, बापाचं तरी काय चुकलं? आत्महत्या केल्यानी तो जगाच्या दृष्टीनी भ्याड, पळपुटा वगेरे ठरलाच असणार पण.....
आत्महत्या करणं, स्वत:ला संपवणं, आपल्या कुटुंबाची आपल्या पश्चात होणारी फरफट अटळ असताना हा निर्णय खरच किती दुख:दायक, किती क्लेशदायक असेल?
आयुष्यभर कधीही बापानी हिम्मत हरली नाही, काही वर्षांपूर्वी अस काही होईल हा विचारही माझ्याच काय पण गावाच्या कुणाच्याही मनात कधी फिरकला नसता. सत्य हे कल्पनेपेक्षा विचित्र आणि भयानक असत हेच खरं. शेती हेच आमच्या कुटुंबाचं उत्पन्न येणारं साधन होतं, भारतातील शेती हि शेतकर्यांच्या कष्टापेक्षा इतरच बाह्य परिस्थिती वर अवलंबून असते. अवेळी पडणारा अत्यंत बेभरवशी पाऊस, बियाणांची गुणवत्ता, कीड, खत अशा अनेक घटकांच्या हवाली शेतीचा उत्पन्न असतं. प्रत्येक शेतकरी हा जुगारीच असतो आणि तो हा जुगार दर वर्षी शेतकरी खेळतच असतो.
मागच्या तीन वर्षापासून सतत पडणारा दुष्काळ घराची रयाच घेवून गेला होता. केवळ रोजच्या जेवणासाठी दागिने, भांडी इतकाच काय गुरं देखील विकायची पाळी बापावर आली होती. पण यावर्षी अन्न देखील दुर्लभ होतं. जो अन्न पिकवतो त्याचीच मुलं उपाशी झोपायची. पण बापाची उमेद कायम होती, त्यात जूनच्या पहिल्याच आठवड्यात पाऊस पडल्याने तो जरा खुश दिसत होता. पण पेरणी करायची तरी पैसा हवाच, जवळ दमडाहि नव्हता. शेवटी काळजावर दगड ठेवून घर गहाण टाकलं आणि माणिकशेट कडून २५०००   रुपये घेतले. पिक आल्यावर पैसे लगेच परत देता आलेच असते त्यामुळे मनावर तसं ओझं नव्हतं.
पहिला पाऊस पडून गेल्यावर बापानं सदयाकाकाची बैलजोडी आणून नांगरणी उरकून घेतली, पेरणी हि पार पडली. हळूहळू हिरवं रान दिसू लागलं होतं. आता फक्त काहीच दिवसांचा प्रश्न होता एकदा पिक आलं कि बरेचसे प्रश्न सुटणार होते. बक्कळ फायदा नाही पण कधीकधी हातात नुसते पैसे खेळत असले तरी बरीच कामं मार्गी लागतात. बाकी  काही नाही पण आमची शिक्षणही रखडली होती हे मात्र बापाला आत कुठे तरी खुपत होतं. सारखा म्हणायचं आता पिक गेलं कि सगळा व्यवस्थित होईल, तुमची शाळाही सुरु होईल.

सगळं व्यवस्थित चालू होता, पण त्यादिवशीची रात्र फारच विचित्र होती, त्यादिवशी संध्याकाळपासूनच आकाशात चारी बाजूनी ढग जमले होते, विजा चमकत होत्या, ढगांचा गडगडता आवाज काळजाचा ठोका चुकवत होता. रात्रभर पाऊस कोसळत होता कि वाटावा जणू ढगफुटीच झाली आहे. बापाचा रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही, रात्रभर येरझार्या घालत तो देवाला, नशिबाला शिव्या देत होता. उभ्या राहिलेल्या पिकावर असं आभाळ फाटल्यासारखा पाऊस म्हणजे संपूर्ण मेहनत, कष्ट, सगळं सगळं वाया. हा अवेळी पाऊस सतत चार दिवस पडत होता, सगळ्या शेतात पाणी भरलं, उभी पिकं आडवी झाली, बरीचशी सडली उरलेली काळी पडली. त्या उजाड शेताकडे पाहून बाप लहान मुलासारखा रडला, त्या दिवसा नंतर त्यांनी बोलणंच सोडलं, शेताकडे तासंतास बघत राहायचा, कुठे जायचा नाही यायचा नाही, झोपायचा नाही. परिस्थिती कधी कधी माणसाला अगदी माकड बनवते आणि त्याच्या माकड चाळ्यानची मजा पण पाहत बसते. काही दिवसापूर्वी ज्या पावसानी बापामध्ये उत्साह संचारला होता, उमेद जागवली होती त्याच पावसानी आज बाप पुरा कोसळून गेला होता.

आज सकाळी मायच्या किंचाळीन जाग आली, शेतात बाप पडला होता, बाजूला कीटकनाशकाची बाटली होती, त्या विषानी काळानिळा पडलेल्या त्याच्या चेहेर्याकडे पाहवत नव्हतं. खिशात चिट्ठी होती.

"मी हरलो, माझ्या नशिबापुढे! उभ्या आयुष्यात सुखाचे चार दिवस नाही देवू शकलो. पोरांचं शिक्षण थांबलं, मनी चा लग्न लांबलं. ह्याला मी जबाबदार आहे. हे शापित, दळभद्री आयुष्य मी संपवतो आहे. निदान तुमचं बाकी आयुष्यातरी सरकारनी दिलेल्या दीड लाख रुपयावर सुखी होईल"    
------------------------------------------------------------------------------------------------------

सध्या इतर भ्रष्टाचाराच्या गोंधळात टीव्ही आणि वर्तमानपत्रातून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या अतिशय गौण बनल्या आहेत. बऱ्याच लोकांच्या नजरेसही त्या पडत नसतील...पण वस्तुस्थिती फार वेगळी आहे, ह्या दुर्दैवी घटना अजूनही थांबलेल्या नाहीत. जो अन्न पिकवतो तोच इतका दुर्लक्षित राहिला तर पुढे काय?
कर्जमाफी फक्त बँकांमधून कर्ज घेतलेल्यांची झाली सावकार किंवा तत्सम कुणाकडून घेतलेल्यांची नाही. तुलनेनी अशा गावाच्या सावकाराकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या खूपच जास्त आहे. हे असाच चालू राहिला तर खायचा अन्न देखील भारताला आयात करावं लागेल यात शंका नाही.

१० टिप्पण्या:

  1. >>परिस्थिती कधी कधी माणसाला अगदी माकड बनवते आणि त्याच्या माकड चाळ्यानची मजा पण पाहत बसते. +१
    अवघड आहे स्थिती...स्वातंत्र्याला ६० वर्षं उलटूनही आपली अधिकांश शेती अजूनही पावसावर अवलंबून आहे आणि पर्यायाने शेतकर्‍यांचं आयुष्य हे आपलं दुर्दैव! :(

    उत्तर द्याहटवा
  2. खरंच हे फारच भयंकर आणि निराशाजनक आहे.. आणि तितकंच चीड आणणारं !!

    उत्तर द्याहटवा
  3. बाबाशी सहमत. कधीतरी बदलेल का हे चित्र? :(

    उत्तर द्याहटवा
  4. हेरंब, अगदी बरोबर, हे वाईट तर आहेच आणि चीड येणारं देखील.
    भेटीबद्दल मनापासून धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  5. कालच्या कि आजच्या कुठल्या पेपर मध्ये होतं...अमेरिकेत देखील मोठमोठी वादळे येतात, शेतीची हानी होते...परंतु, सरकार शेतकऱ्यांची काळजी घेत असल्याने आत्महत्या नाही होत... :(

    उत्तर द्याहटवा
  6. अनघा ताई: ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद...
    अमेरिकेत एखादा शेतकरी जरी आत्महत्या करून गेला...तरी लगेच त्यावर कडक action घेतली जाईल. आपल्याकडे काही फरक पडत नाही...अवेळी पाऊस आला कि लगेच भाज्यांचे भाव फक्त वाढतात.

    उत्तर द्याहटवा