शुक्रवार, २९ ऑगस्ट, २०१४

आनंदपर्व गणेशोत्सव

गणपती उत्सवात मी पुण्यात नसलो कि फार विचित्र अवस्था होते, मनाची एक वेगळीच घालमेल अनुभवायला मिळते. ह्यापूर्वी एक दोन वेळेला मी हिच अवस्था अनुभवली आहे, ह्यावर्षी पुन्हा तीच आणि तशीच घालमेल, ओढ, तगमग. कळत नाही कि काय होतय.

वास्तविक हे खूपच विसंगत आहे कारण  गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप पूर्णता बदलून गेले आहे. हे मी आज म्हणतोय, परंतु आमचे बाबा हे काही अनेक वर्षांपासून म्हणत आहेत एवढाच काय तो पिढीच फरक आहे असं म्हणूया. आज काल सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी गणपतीला राजा म्हणवून घ्यायची चढाओढ चालू केलीय. त्यात गणपतीच्या श्रीमंतीचा, दागिन्यांचा झगमगाट  बघून आपण एका दागिन्यांच्या दुकानात तर नाही ना असं वाटून जाते.


                                    ‘देवळात गेल्यावर माणूस दुकानात गेल्यासारखं वागतो’                                                                                  ‘रुपया दोन रुपये टाकून काही ना काही मागतो’ – संदीप खरे 

'आजू बाजूच्या सगळ्या गोष्टीतून आपला फायदा कसा ते बघा’ ह्या वाढणाऱ्या मतलबी प्रवृत्तीचे  आणि प्रकृतीचे पडसाद ह्या उत्सवात आणि सरावाच उत्सवात पडलेले सहज दिसून येतात, आज  ह्याच उत्सवाचे रुपांतर एका प्रचंड मोठ्या आणि कल्पने पलीकडच्या व्यवसायात झाले आहे. साहजिकच ह्या सुवर्ण संधीचा फायदा घ्यायला सर्व मान्यवर राजकारणी ह्यात मनापासून  सहभागी होतात आणि आपली वर्षभराची तुट भरून काढतात. शेवटी दुकान म्हटलं कि ग्राहकाला काही ना काहीतरी 'returns' मिळावे लागतात तशाच प्रकारचे काही ह्या उत्सवात मांडलेल्या दुकानातून पहावयास मिळते, मग प्रचंड रोषणाई, भव्य देखावे, नवसाचे गणपती, फोटो, सोन्याची नाणी, प्रसाद वाटप, गणपतीच्या उंचीवरून असलेली चढाओढ, प्रसिद्धीसाठी केलेली धडपड, श्रीमंतीचा देखावा हे सगळे त्याचेच वेगवेगळे प्रकार.


पुण्यात मागच्या एक दोन वर्षातले बदल तर आश्चर्यकारक आहेत, ह्यात मग अचानक कुठलातरी गणपती नवसाचा गणपती झालाय (जिथं टोप्या घातलेले कार्यकर्ते हातात पैश्यांच्या नोटा नाचवत असतात), तर कुठला पुण्याचा राजा झालाय, भागातील प्रत्येक पुढारी मंडळींचा एक गणपती बसू लागलाय. पण सर्वात मोठा उल्लेख करावा तो ढोल पथकांचा. दोन चार वर्षांपूर्वी अगदी बोटावरमोजण्या इतकी हि पथकांची संख्या आज ५० च्या पुढे जाऊन पोचली आहे. पूर्वी प्रामुख्याने शाळेतील काही मंडळी स्वतःहून ह्यात सहभागी होत असत, आता हा देखील एक मोठा व्यवसाय झाला आहे कि ज्याच्या जाहिराती आपण सर्वांनी संपूर्ण पुणे शहरात पहिल्या आहेत. व्यवसाय म्हणतो ते केवळ एका कारणासाठी, ह्या ढोल पथकांचे आयोजक गणपती मंडळांकडून मिरवणुकीसाठी भरपूर पैसे (सुपारी) घेतात आणि सहभागी वादकांची, वडापाव, जेवणावर बोळवण करतात. ह्याचा एकमेव फायदा म्हणजे दारू पिवून ढोल वाजवणाऱ्या परंपरेची बंदी. आता मिरवणुका फारच शिस्तबद्ध होतात ह्यात शंका नाही.


मुंबई मध्ये गणपती उत्सवाचे एक वेगळेच रूप बघायला मिळते. पूर्णपणे बंदिस्त मंडप, त्याबाहेर लागलेली दर्शनाची रांग, दर्शनाला तिकीट, मग काही राजांच्या दर्शनासाठी लागलेली २० तास २२ तासाची रांग, राजाच्या दरबारातील शुल्लक शेवकांची आरेरावी/ मुजोरी आपल्याला  सगळीकडे दिसत आहे. प्रत्येक राजकीय पक्षाचे एक मंडळ, संपूर्ण मंडपावर नेत्यांचे स्वागत करणारे फोटो, म्हणजे ज्या गणपतीचा उत्सव आहे त्याची मूर्ती बंदिस्त अंधारात आणि नेते मंडळींचे फोटो सर्वत्र अशी काही परिस्थिती दिसते. विसर्जन मिरवणुकीमध्ये तर ह्या राजकीय पक्षांच्या काळ्या पैश्याची उधळण दिसते, मग रस्त्याच्या दुतर्फा लागलेले भव्य/ अतिभव्य स्वागतकक्ष, त्यावर निरनिराळ्या पक्षांचे झेंडे, लांबून भयानक दिसणारे मोठे मोठे नेते मंडळींचे फोटो, त्याबाहेर चालू असलेले खाद्य पदार्थ/थंड पेय/ चहा/ ताक/ लस्सी/ ice cream चे वाटप. हे  बघून तर जीव नकोसा होतो. कचरा करण्यात तर आपला हात कुणीही धरू शकत नाही, मग खाऊ तिथेच घाण करून सगळा परिसर खराब करून जातो ह्याचा आम्हाला भानच राहत नाही. उत्सव महत्वाचा. नेते मंडळी देखील ह्या कचऱ्याची जबाबदारी अजिबातच घेत नाहीत. घाणीचं साम्राज्य असलेल्या खाडी, समुद्रामध्ये केलेला विसर्जन. असो.



ह्यावर्षी निवडणुका उंबरठ्यावर थकल्या असताना गणपती उत्सवाला मिळालेली वेगळीच झळाळी सर्वांना अनुभवायला मिळेल ह्याची मला खात्री आहे. सर्वत्र banners युद्ध पेटून त्याचा महापूर आला असेल, रोषणाई पण जरा जास्तच असेल, मिरवणुकीत सहभागी पथकांची संख्याही वाढली असेल. निधीची चणचण कुठल्याही मंडळाला भासणार नाही ह्याची खात्री मी देतो.

दिवसेंदिवस लांबणारी/ दोन दोन दिवस चालणारी मिरवणूक, थिरकते संगीत, दारू/ सिगारेटचा  मुक्त आस्वाद घेत धुंद अवस्थेत नाचणारी तरुणाई, ध्वनी प्रदूषण, वाहतुकीची कुचंबणा, मुजोर कार्यकर्ते, काळ्या पैश्याचं प्रदर्शन ह्या बद्दल न बोलणंच चांगलं. एकूणच सांगायचं तर उत्सवाचे स्वरूप अतिशय ओंगळवाणे झालं आहे ह्यात शंका नाही.

मग मी उत्सवात सहभागी नसलो तर काय बिघडलं? माझी हळहळ, हुरहूर हि ह्या अश्या गणेशोत्सावासाठी आहे? पण थोडा विचार केल्यावर जाणवले कि हे सगळे ह्या ओंगळवाण्या  उत्सवासाठी नाही तर ती केवळ घरोघरी पाहुणचारासाठी येणाऱ्या मंगलमुर्ती   गणरायामुळेच  ह्यात शंका नाही.
मला जेंव्हापासून कळतंय आणि आठवतंय तेंव्हापासून घरी गणपती बसतो, आमचा हौसेनी बसवलेला गणपती आहे. बाबांनी गणपती बसवायला सुरवात केली, आणि तेच सर्व जबाबदारी दरवर्षी मनोभावे पार पाडतात. आजोबा कधीच त्यात पडले नाहीत आणि बाबांनी परंपरा आज पर्यंत पुढे आणली.
पूर्वीपासून आम्ही घरी आरास बनवतो. केलेली आरास फार भव्य आणि आणि दर्जेदार असते असं नाही, पण नेटकी आणि सुंदर असते हे नक्की. सध्याच्या काळात अनेक readymade पर्याय उपलब्ध असतानाही आम्ही अजूनही घरीच आरास करतो आणि त्यात एक वेगळाच  आनंद आणि समाधान मिळतं. गणपतीच्या आदल्यादिवशी रात्रभर हे काम भावाच्या/ बायकोच्या मदतीने चालू असतं.

मग ह्याच काळात सर्व भावंडानबरोबरची आरती आणि मग खादीमंडळ, सगळ्या मित्रांच्या घरी  पहिल्याच दिवशी जाऊन गणपतीचे घेतलेले दर्शन, सातही दिवस केलेले अथर्वशीर्ष पठण, विसर्जनाच्या दिवशी आवर्जून जमलेले नातेवाईक, दणकून केलेली आरती, झांज/ टाळ्या वाजवत गणरायाला दिलेला निरोप ह्या सगळ्याच गोष्टी प्रचंड उत्साहात होतात. अवर्णनीय आणि खूप समाधान देवून जातात. पाच-सात दिवस घरातलं वातावरण खऱ्या अर्थानी मंगलमय होवून जातं. तसं पाहीलं तर नवीन काही नाही दरवर्षी घरोघरच्या गणपती उत्सवातल्या ह्या त्याच त्याच घटना आणि गोष्टी मात्र अमाप आनंद देऊन जातात ह्यात शंका नाही. आणि एखाद्या वर्षी हे सगळं नाही अनुभवता आलं तर हुरहूर तर लागणारच!

कालपरत्वे उत्सवाचं स्वरूप बदललं असं आपण म्हणालो. आणि खरं तर आता गणेशोत्सव सार्वजनिक करण्यामागचा मूळ उद्देश देखील कालबाह्य झाला असल्याने तो बंद करून टाकावा म्हणजे त्या अनुशांगणी घडणाऱ्या वाईट, अप्रिय घटना आपोआपच बंद होतील असं माझं मत आहे. आजच्या काळात गणेशोत्सवाचे मांगल्य आणि परंपरा टिकून आहे ती घरो-घरी बसणाऱ्या गणपतीमुळेच


मंगलमुर्ती मोरया

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा