सोमवार, २४ जानेवारी, २०११

इंद्रदेवाची सत्ता धोक्यात??

टेन्शन....टेन्शन...टेन्शन....या टेन्शन मुळे आज देवाधीदेव इंद्रालाही निद्रादेवी प्रसन्न होत नव्हती, काही केल्या आज झोप काही येत नव्ह्ती. मधे जरा डोळा लागतोय न लागतोय तोच भूलोकीचे असूर मुलायम, लालु सिंहासन हलवत उखडुन टाकत आहेत यासारख्या भयानक स्वप्नांनी दचकुन जाग येत होती. ब्लड प्रेशरचा त्रासही पुन्हा सुरु झाल्यासारखं वाटत होतं. 'सालं आजकालच्या अमृतामध्येसुद्धा पूर्वीसारखा गुण राहिला नाहीये. मी तर सकाळ संध्याकाळ अर्ध्या ग्लास डोस घेतो...पण काही उपयोग नाही'.
सकाळला अजुन ४ तास बाकी आहेत आता ३ तास....या विचारात डोळ्याला डोळा लागला नाही. उद्याचा दिवसच असा होता, इंद्रदेव असला म्हणुन काय झालं? त्यालादेखिल कुणाला तरी रिपोर्ट करावंच लागतंच ना. तो राजा पण शेवटी बोलुनचालुन देव जनतेचा सेवकच ना? मागच्या आठवड्यात अचानक एका देवजनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान जगद्निर्माता ब्रह्मदेव आणि जगद्नियन्ता  विष्णूदेव यांच्या द्विसदस्यिय समितीने देवलोकाचे २०१० सालाच्या कारभाराचं ऑडिट करावं असा निर्णय जाहीर केला आणि दोन त्रुतीयांश बहुमत असलेल्या इंद्रदेवाच्या सत्तेला हादरा दिला होता. तरी बरं इंद्राच्या वकीलांनी ताबडतोप अर्ज करुन ऑडिटला एक आठवड्याची मुदतवाढ मागून घेतली, आणि येणारं संकट अंमळ पुढे गेलं. मागील  वर्ष देवलोकासाठी विलक्षण घडामोडींच आणि धकाधकीचं होतं, विरोधी पक्षांनी सर्व घटनांचा योग्य वापर करुन प्रत्येक दिवस ढकलणं मुश्कील करून ठेवलं होतं.

सगळ्याची सुरवात त्या "त्रिलोक क्रिडास्पर्धांनी" झाली, भूलोकीचे आणि पाताळातील अनेकजण या स्पर्धांच्या आयोजनासाठी उत्सुक असताना देवांनी याचं यजमान पद मिळवण्यासाठी सर्व मार्गांचा वापर करत विजयश्री खेचुन आणली आणि देवलोकाला २०१० च्या "त्रिलोक क्रिडास्पर्धांचे" यजमानपद मिळालं.
वित्तमंत्री कुबेरदेवाकडे खर्चाची जबाबदारी दिली आणि चित्रगुप्ता कडे हिशोबाची सुत्रे दिली, दोघेही आपापल्या क्षेत्रात अत्यंत अनुभवी, प्रवीण होते तसेच ते स्वच्छ प्रतिमेसाठी दोघेही प्रसिद्ध होते. यादोघांच्या निवडीमुळे मी निर्धास्त झालो होतो, यापेक्षा अजुन योग्य नियुक्ती त्रिलोकात कुणालाही करण शक्यचं नव्हतं याविचारानी मी स्वतःवरच खुष झालो होतो. सुरवातीला सगळं सुरळीत चालु होतं पण देवसमाचार, देवलोक २४ x ७ सगळ्या चॅनल्सनी एक एक करुन भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढायला सुरवात केली. इथेच हे सगळं थांबलं नाही तर भूलोक आणि पाताळातही याची चर्चा सुरु झाली. देवलोकाची बदनामी व्हायला सुरवात झाली. "हे विरोधक सुखाचे चार दिवस काही बघु देतील तर शप्पत.....नक्कीच त्यांच कारस्थान असणार" मलाही असंच वाटलं होतं, पण आमच्या देवांनी भ्रष्टाचारात चारा सम्राट लालु आणि कलमाडींनाही मागे टाकलं होतं. अस्तित्वात नसलेल्या कंपनींना कंत्राटं, नातलग, हितचिंतकांना कंत्राटं जमेल त्या मार्गांनी संबंधित देवांनी यथेच्य खावुन घेतलं होतं. 'वाढता वाढता वाढे भेदिले सुर्यमंडळा', बजेट वाढता वाढता इतकं वाढलं कि साक्षात कुबेराला कर्ज घ्यावं लागलं. मी तरी कुठे कुठे बघणार? सही करताना प्रत्येक कागद वाचणं शक्यचं नाही, नेमुन दिलेल्या जबाबदाऱ्या चोख, आणि इमानदारीने पार पाडायला नकोत का? आपलेच दात आणि आपलेच ओठ, कुणाला सांगायचं? चौकशीचे आदेश देवुन कसंबसं प्रकरण शांत केलं, स्पर्धा पार पडल्या......पण फार म्हणजे फार मनस्ताप झाला हो.. आणि बेअब्रु झाली ती निराळीच.

स्पर्धा पार पडल्यापडल्या मी तत्काळ संबधित सचिवांना निलंबित केलं, बाकी मंत्रांच्या चौकशीचे आदेश दिले. (बाकी देव शांत होतात हो अशी 'fast Action' घेतल्यामुळे, काय असतं भूलोकीचे मनुष्य प्राणी असोत वा देवलोकीचे देव प्राणी सगळ्या जनतेची स्मरण शक्ती कमीच..हे एक वरदान राजकारण्यांना मिळालेला आहेच. त्याचा योग्य वापर करणारेच या खुर्ची राजकारणात टिकतात.)
स्पर्धांच्या धावपळीमुळे इंद्राची तब्येत खालावली, हवापालटासाठी काही दिवस कैलास मानसरोवर यात्रेस गेलं. सुट्टी संपवून येईतो देवलोकात हलकल्लोळ माजला होता. सकाळचा पेपर हातात पडताच इंद्राचा ब्लड प्रेशरचा त्रास पुन्हा सुरु झाल्या सारखं झालं.

- महागाई गगनाला.....देवाधीदेवांच्या मंत्र्यांच्या साठेबाजीमुळे देव जनता त्रस्त.
- यमलोक-भूलोक Expressway च्या टोलनाक्याची यमदूतांकडून तोडफोड. प्रलंबित भरमसाठ टोल आणि खड्डेयुक्त रस्त्यांमुळे वाढणाऱ्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर..
- अप्सरेला इंद्रदेवानी बक्षीस म्हणून दिलेल्या flat च्या चौकशीचे आदेश
- यमदेवावर वाढलेलं लोड                 
- क्रीडा घोटाळ्यांवर देवाधीदेवांना कारणे दाखवा नोटीस
- देवालोकाचे कामकाज ठप्प.... विरोधकांकडून इंद्रदेवाच्या राजीनाम्याची मागणी

आरे बाप रे बाप एक ना दोन सारा पेपरच घोटाळ्यांनी भरलेला. अति झाल्यावर काहीतरी ठोस पावलं उचलावीच लागतात ना? त्याचाच परिणाम म्हणजे हे ऑडीट आहे.        
 
पण पुढे काय झालं? इंद्राचा राज्य गेलं? त्यांनी राजीनामा दिला? भ्रष्ट मंत्रांवर कारवाई झाली? कोण कोण दोषी आढळले? कोणाला अटक झाली? महागाई कमी झाली का? टोल कमी आणि रस्त्यांचा दर्जा सुधारला का? मुदतपूर्व निवडणुका?

काळजी करू नका...अहो इतक्या लवकर असं काही होतं का? इंद्राचे शासन निर्विवाद मध्ये चालूच आहे.

दर महिन्याप्रमाणे इंद्रदेवाकडून खालील निवेदन नुकतंच प्रसिद्ध झालं आहे...
"सर्व तथा कथित भ्रष्ट मंत्रांची चौकशी चालू आहे.... कोणी दोषी आढळल्यास, दोषींवर कारवाई करण्यास हे सरकार वचनबद्ध आहे...महागाई हा चिंतेचा विषय आहे...सरकार त्यावर ठोस पावलं उचलत आहे..लवकरच त्याचे परिणाम दिसतील."

स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या निधना बद्दल काय लिहिणार? पुण्यात असल्याने त्यांच्या अंत्यादर्शनाला प्रत्यक्ष जावून नतमस्तक होता आलं हीच एक समाधानाची बाब.
पंत आणि पाठोपाठ भीमसेनजींच्या निधनानी कला क्षेत्रात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

स्वरभास्कराचा अस्ताने शास्त्रीय गायन क्षेत्रात काळोखाच राज्य पसरलं आहे हे नक्की. त्यांनी रचलेल्या 'कलाश्री' रागानेच त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.

http://www.youtube.com/watch?v=9ViMk88PhTM

गुरुवार, १३ जानेवारी, २०११

पंत तुम्हाला मानाचा मुजरा

काही लोकोत्तर पुरुष कुठलाही वारसा नसताना एखाद्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वानी असं काही नावलौकिक मिळवतात कि त्यांचं नाव त्या क्षेत्रात अमर होवून जातं. पणशीकरांच्या संस्कृत, ज्योतिष आणि वेद्शास्त्राची दोन पिढ्यांची परंपरा लाभलेल्या घराण्यात १४ मार्च १९३१ प्रभाकराचा जन्म झाला. आजोबा पंडित वासुदेव शास्त्री पणशीकर, वडिल पंडित विष्णूशास्त्री पणशीकर यां दशग्रंथी पंडितांच्या तालमीत हा सुर्य वाढत होता. या कुटुंबालाच काय पण सगळ्या घराण्याला स्वप्नातही वाटलं नसतं की हा मुलगा पुढे मराठी रंगभूमीवरिल ५० वर्ष अनभिषिक्‍त सत्ता गाजवेल मोठा रंगकर्मी, नटश्रेष्ठ म्हणुन दैदिप्यमान यश मिळवेल,  रसिकांच्या मनात कायमची जागा मिळवेल.
१५ व्या वर्षी हौस म्हणुन शाळेच्या नाटकात केलेली सुरुवात, त्यातील भूमिके बद्दल मिळलेली दाद, वाहवा,  कौतुकच त्यांना रंगभूमीच्या अधिकाधिक जवळ घेवुन गेलं. रंगभूमी आणि त्यांचं घट्ट नातं बनून गेलं हि हौसच पुढे जगण्याचं ध्येय बनलं, ह्याच ध्येयापोटी घर सोडलं, रस्त्यावर दिवस काढले पण माघार कधीच घेतली नाही.
आचार्य  अत्रे लिखीत "तो मी नव्हेच" नाटकाची सुरुवात झाली त्यात प्रभाकर पणशीकरांनी एक नाही दोन नाही तर तब्बल पाच वेगवेगळ्या भूमिका साकार केल्या आणि महाराष्टातच नाही तर शेजारी राज्यातील रसिकांना देखील अक्षरशः वेड लावलं. या नाटकाचे हजारो प्रयोग झाले, फिरत्या रंगमंचाचा प्रथमच वापर करुन कल्पक बुद्धीची ओळख करुन दिली. आपल्या खणखणीत आवाज, स्पष्ट उच्चार, अभिनयकौशल्याच्या बळावर त्यांनी 'तो मी नव्हेच' मधला लखोबा लोखंडे, 'अश्रुंची झाली फुले' मधला प्राध्यापक विद्यानंद, 'इथे ओशाळला मृत्यू' मधला औरंगजेब हि पात्रे अजरामर केली. याच बरोबर ‘जस्टीस देवकीनंदन’, ‘चंदर’, ‘ग्लाडसाहेब’  या भूमिकांनाही रसिकांनी भरभरून दाद दिली
नाट्यसंपदा हि स्वतः ची संस्था उभारली, एकूण ४३ नाटकं त्यांनी रंगभूमीवर आणली त्यांचे हजारो प्रयोग केले, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा पहिला ‘जीवन गौरव पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार असे १६ पुरस्कार त्यांना मिळाले.

या थोर अवलियाला आम्हा रसिकांकडून मानाचा मुजरा!
प्रभाकर पणशीकरांच्या निधनानी लखोबा लोखंडे आणि शेहेनशहा औरंगजेबही आज पोरका झाला.
पंत तुम्ही आपल्या  खणखणीत आवाजात फक्त "तो मी नव्हेच!" जरी म्हणाला असतात तरी तो काळही   माघारी फिरला असता.

रविवार, १९ डिसेंबर, २०१०

शिवतीर्थ रायगड आणि मी

बऱ्याच दिवसापासून जाईन जाईन म्हणत होतो, पण काही केल्या प्लानच ठरत नव्हता. आम्हा मित्रांच्या वेगवेगळ्या सुट्या, ऑफिस यातून अजिबातच जमत नव्हतं. पण अखेर आमचा प्लान ठरला आणि आम्ही 'रायगड' ला जायला सज्ज झालो. सर्व बुकिंग आणि ट्रेनची तिकिटे पण काढून झाली होती. 

मला आणि अभिषेक ला वेळेवर कुठे पोचायची लहानपणापासूनच सवय नाहीये, त्यामुळे इतक्या लवकर उठून, आवरून आम्हाला पुणे स्टेशन वर पोहोचायला थोडासा उशीरच (जवळपास फक्त पाऊण तास) झाला. स्टेशन बाहेर जयदीप आमची वाटच बघत होता. आम्ही दिसताच त्यांनी प्रचंड शिव्या द्यायला सुरवात केली, 'आरे हि काय वेळ झाली यायची... ६.१५ ठरलं होता ना काल...., गेली ट्रेन... आता बसा बोंबलत....'. (हा प्राणी कधीही वेळ चुकवत नाही त्याला आम्ही काय करणार?). मी त्याला समजावण्याच्या सुरात म्हणालो 'हा अभिषेक....तुला माहिती आहे ना त्याचं, नेहमीच उशीर करतो. (जयदीप ला पूर्ण माहित होतो कि आम्ही दोघेही नेहमी उशिरा येतो) पण तू tension घेवू नकोस,  ७.१५ ला पुढची ट्रेन आहे, आणि आपली तिकिटे चालतात त्याला, चला चहा घेवूया.....'
बरोबर ७.१५ ला पुणे- महाड (शिव प्रताप एक्स्प्रेस) आली आणि आमच्या प्रवासाला एका तासाच्या विलंबानी सुरवात झाली. रिझर्वेशन चा लफडा नसल्यानं ह्या गाडीत जिथे जागा मिळेल तिथे बसता येतं. सकाळच्या ११.१५ पर्यंत दर तासा- तासानी गाड्या आहेत, पुढे दीड दीड तासांनी. दोन तासाच्या नयनरम्य प्रवासात गाडी आपल्याला सह्याद्रीच्या कडेकपारीतून, हिरव्यागार निसर्गाच्या कुशीतून फिरवून महाड ला पोचवते. वाटेत फक्त तीन स्टेशन्स लागतात कात्रज, कापूरहोळ आणि नीरा. प्रवासात यथेच्च खादाडी करून आम्ही महाड रेल्वे स्टेशन वर उतरलो.          
   
महाड स्टेशन वरून बाहेर पडताच रायगड टुरिझमच तिकीट ऑफिस दिसतं ह्या ऑफिस मधून पुढील प्रवासासाठी तिकीट काढावी लागतात. जयदीप आमचा बुकिंग आणि बाकी arrangements  साठी मुख्य समन्वयक आहे, बऱ्याच वेळा तोच हे सगळं बघतो. नंतर आम्हाला कळलं कि पुढे गडापर्यंत जाण्यासाठी बस ची हि तिकिटे आहेत. तिकीट १०० रुपये आहे, महाड- रायगड जावून येवून प्रवास आणि गडावरचा प्रवेश यासाठी हे एकच तिकीट वापरता येतं. जयदीप नि आम्हाला अजून माहिती पुरवली कि पर्यावरण च्या रक्षणासाठी सरकारनी येथे private वाहनांना संपूर्ण बंदी घातली आहे. सर्वांना महाड- रायगड जाण्यासाठी   रायगड टुरिझमच्या बस चा वापर बंधन कारक आहे. ह्या मस्त ग्रीन-इको AC बस नि आम्हाला पुढचा २४ km चा प्रवास करायचा होता. साधारणता 25 मिनिटांमध्ये आम्ही रायगडाच्या पायथ्याशी पोचलो. ज्या ठिकाणी महाराजांचा राज्याभिषेक झाला अशा मराठी साम्राज्याचा राजधानीचे दर्शन आपण घेणार आहोत या केवळ भावनेनी माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले.

वर जाण्यासाठी दोन पर्याय आहेत एक रोपेवे आणि दुसरा पायऱ्या चढत, जवळपास १४५० पायऱ्या आहेत आणि ३ तास त्या तुमची सतत परीक्षा घेत असतात. तिघांचही वाढलेलं वजन आणि शारीरिक क्षमता  लक्षात  घेवून आम्ही रोपेवेनि जाण्याचा निर्णय घेतला. वर गेल्यावर राजदरबार, टकमक टोक, महाराजांची समाधी, याचबरोबर मुख्य आकर्षणं आहेत ती म्हणजे 'शिवराय राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय' आणि संध्याकाळी होणारा 'शिवराज्याभिषेकाचा' होणार ध्वनी-प्रकाश कार्यक्रम. ह्या दोन्हीसाठी एकचं तिकीट लागतं, रांगेमध्ये उभं राहायचा त्रास वाचवण्यासाठी आम्ही अगोदरच इंटरनेट वरून तिकीट बुक केली होती. वस्तुसंग्रहालयात त्याकाळातील वस्तू, चित्र, कलाकृती, दागिने यांचं प्रचंड जतन केलेला ठेवा आपल्या समोर तो काळच जणू जिवंत करतो. ह्याच बरोबर तलवारी, दांड्पत्ते, समशेर, तोफा- तोफगोळे, चिलखत हे देखील पाहायला मिळते. हा मराठी साम्राज्याचा वारसा अतिशय उत्तम रीतीने जपून ठेवणाऱ्या सरकारला आणि पुरातत्व खात्याला आपण मनापासून धन्यवाद देतो. ह्या सगळ्या बरोबरच अर्ध्यातासाची महाराजांचा जीवनपट उलगडणारी आणि माहिती देणारी फिल्म दाखवण्यात येते. ती खरच अवर्णनीय आहे.
अशाप्रकारे पूर्णपणे भारावलेल्या अवस्थेमध्ये आम्ही त्या मुझीयम मधून बाहेर आलो, त्यानंतर आम्ही  पुढील ठिकाणे पाहायला निघालो ह्यात महादरवाजा, हिरकणीचा बुरुज, हत्ती तलाव, गंगासागर तलाव, टकमक टोक, बाजारपेठ इ. जागा पहिल्या. महारांच्या समाधी पुढे नतमस्तक झालो. अरे हो एक गोष्ट सांगायचीच राहिली आम्ही गडावर फिरताना ऑडियो सिस्टीम घेतली होती म्हणजे तुम्ही ज्या जागा पाहत आहात तिथला इतिहास आणि इतर माहिती तुम्हाला ऐकता येते. ह्याचा मुख्य फायदा म्हणजे साक्षात इतिहासच आपल्याला मी काय काय पाहिलं आहे ते सांगतो आहे असा भास होतो.  

आता शेवटचं आकर्षण होतं ते म्हणजे "शिवराज्य अभिषेक". बरोबर सायंकाळी ६.30 वाजता हा कार्यक्रम सुरु झाला, रायगड आमच्याशी बोलत होता आणि शिवराज्याभिषेकाच  पान आमच्या पुढे उलगडत होता. सुंदर प्रकाश योजना, बाबासाहेब पुरंदरे यांचा आवाज ह्या सगळ्यांनी वातावरण जिवंत केला होतं. ह्या सगळ्याला कुठलीही तोड नव्हती, वर्णन करायला शब्द नव्हते, फक्त मनात साठवलं जात होतं.
'जेष्ठ शुद्ध त्रयोदशीचा तो शुभमंगल दिवस. हिंदू स्वराज्याचा सुवर्ण सौभाग्याचा क्षण उगवला. गागाभट्ट आणि इतर पंडितांनी उच्च स्वरात वेदमंत्र म्हणण्यास प्रारंभ केला, अन त्या प्रचंड वेदघोषात महाराज सिंहासनाला पदस्पर्शा होवू ना देता सिंहासनावर स्थानापन्न झाले. पूर्वेला सूर्योदयाची पूर्वचिन्हे उमटली होती. मंत्रघोष करीत असतानाच गागाभट्टानी मौल्यवान जडावाचे, मोतीलग झालरीचे छत्र उचलले. ते राजांच्या मस्तकावर धरले. मंत्रघोष संपला. क्षणभराची पण श्वास दडपून टाकणारी शांतता राजसभेवर पसरली. दुसऱ्या क्षणाला आसमंतात घोषणा दुमदुमली
                               "क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर गोब्राह्मणप्रतिपालक
                                            हिंदुपतs पातशहाs श्रीमंत श्री छत्रपती
                                            शिवाजी महाराज कि ........ जय ......"      
अद्भुत, अलौकिक, अवर्णनीय असा हा अनुभव होता.

अचानक "Mission Impossible" ची tune वाजू लागली, काहीच कळत नव्हतं काय आहे ते...पुन्हा तीच tune वाजली, ह्यावेळी मात्र कळलं कारण माझे डोळे उघडले, गजर वाजत होतां. 'च्यायला स्वप्न होतं हे'. मी तसाच काहीवेळ अंथरुणात बसून राहिलो. युरोपमध्ये फिरताना होणारं दु:ख, तळमळ, तगमग पार  स्वप्नापर्यंत जावून पोचली?  
तरीच सारखी शंका येत होती....हे असं नाहीये आणि मी याआधी सुद्धा गेलो आहे रायगड ला.
स्वप्न आणि सत्य ह्याची टोटल लावत मी ऑफिस ला जायची तयारी करू लागलो.

रविवार, १२ डिसेंबर, २०१०

त्याचं काय चुकलं?

गावाच्या स्मशानात भयाण शांतता पसरली होती, गावकऱ्यांची कुजबुज पेटत्या चितांच्या आवाजात विरून जात होती. स्मशानातल्या मूळच्या उदास आणि उजाड वातावरणात सायंकाळच्या संधीप्रकाशानी कुबटपणाचीही भर पडली होती. समोर पेटलेल्या चितांच्या धुरानी सारा आसमंत झाकोळून गेला होता.
भीमा निर्विकार चेहऱ्यानी बापाच्या पेटत्या चीतेकडे एकटक पाहत होता. मनात विचारांचं काहूर माजलं होतं, धाकटी बहिण, विधवा आईचा चेहेरा नजरे समोरून हलत नव्हता.

भीमा ला कसलीच जाणीव होत नव्हती, फिरून फिरून एकच विचार मनात येत होतं, बापाचं तरी काय चुकलं? आत्महत्या केल्यानी तो जगाच्या दृष्टीनी भ्याड, पळपुटा वगेरे ठरलाच असणार पण.....
आत्महत्या करणं, स्वत:ला संपवणं, आपल्या कुटुंबाची आपल्या पश्चात होणारी फरफट अटळ असताना हा निर्णय खरच किती दुख:दायक, किती क्लेशदायक असेल?
आयुष्यभर कधीही बापानी हिम्मत हरली नाही, काही वर्षांपूर्वी अस काही होईल हा विचारही माझ्याच काय पण गावाच्या कुणाच्याही मनात कधी फिरकला नसता. सत्य हे कल्पनेपेक्षा विचित्र आणि भयानक असत हेच खरं. शेती हेच आमच्या कुटुंबाचं उत्पन्न येणारं साधन होतं, भारतातील शेती हि शेतकर्यांच्या कष्टापेक्षा इतरच बाह्य परिस्थिती वर अवलंबून असते. अवेळी पडणारा अत्यंत बेभरवशी पाऊस, बियाणांची गुणवत्ता, कीड, खत अशा अनेक घटकांच्या हवाली शेतीचा उत्पन्न असतं. प्रत्येक शेतकरी हा जुगारीच असतो आणि तो हा जुगार दर वर्षी शेतकरी खेळतच असतो.
मागच्या तीन वर्षापासून सतत पडणारा दुष्काळ घराची रयाच घेवून गेला होता. केवळ रोजच्या जेवणासाठी दागिने, भांडी इतकाच काय गुरं देखील विकायची पाळी बापावर आली होती. पण यावर्षी अन्न देखील दुर्लभ होतं. जो अन्न पिकवतो त्याचीच मुलं उपाशी झोपायची. पण बापाची उमेद कायम होती, त्यात जूनच्या पहिल्याच आठवड्यात पाऊस पडल्याने तो जरा खुश दिसत होता. पण पेरणी करायची तरी पैसा हवाच, जवळ दमडाहि नव्हता. शेवटी काळजावर दगड ठेवून घर गहाण टाकलं आणि माणिकशेट कडून २५०००   रुपये घेतले. पिक आल्यावर पैसे लगेच परत देता आलेच असते त्यामुळे मनावर तसं ओझं नव्हतं.
पहिला पाऊस पडून गेल्यावर बापानं सदयाकाकाची बैलजोडी आणून नांगरणी उरकून घेतली, पेरणी हि पार पडली. हळूहळू हिरवं रान दिसू लागलं होतं. आता फक्त काहीच दिवसांचा प्रश्न होता एकदा पिक आलं कि बरेचसे प्रश्न सुटणार होते. बक्कळ फायदा नाही पण कधीकधी हातात नुसते पैसे खेळत असले तरी बरीच कामं मार्गी लागतात. बाकी  काही नाही पण आमची शिक्षणही रखडली होती हे मात्र बापाला आत कुठे तरी खुपत होतं. सारखा म्हणायचं आता पिक गेलं कि सगळा व्यवस्थित होईल, तुमची शाळाही सुरु होईल.

सगळं व्यवस्थित चालू होता, पण त्यादिवशीची रात्र फारच विचित्र होती, त्यादिवशी संध्याकाळपासूनच आकाशात चारी बाजूनी ढग जमले होते, विजा चमकत होत्या, ढगांचा गडगडता आवाज काळजाचा ठोका चुकवत होता. रात्रभर पाऊस कोसळत होता कि वाटावा जणू ढगफुटीच झाली आहे. बापाचा रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही, रात्रभर येरझार्या घालत तो देवाला, नशिबाला शिव्या देत होता. उभ्या राहिलेल्या पिकावर असं आभाळ फाटल्यासारखा पाऊस म्हणजे संपूर्ण मेहनत, कष्ट, सगळं सगळं वाया. हा अवेळी पाऊस सतत चार दिवस पडत होता, सगळ्या शेतात पाणी भरलं, उभी पिकं आडवी झाली, बरीचशी सडली उरलेली काळी पडली. त्या उजाड शेताकडे पाहून बाप लहान मुलासारखा रडला, त्या दिवसा नंतर त्यांनी बोलणंच सोडलं, शेताकडे तासंतास बघत राहायचा, कुठे जायचा नाही यायचा नाही, झोपायचा नाही. परिस्थिती कधी कधी माणसाला अगदी माकड बनवते आणि त्याच्या माकड चाळ्यानची मजा पण पाहत बसते. काही दिवसापूर्वी ज्या पावसानी बापामध्ये उत्साह संचारला होता, उमेद जागवली होती त्याच पावसानी आज बाप पुरा कोसळून गेला होता.

आज सकाळी मायच्या किंचाळीन जाग आली, शेतात बाप पडला होता, बाजूला कीटकनाशकाची बाटली होती, त्या विषानी काळानिळा पडलेल्या त्याच्या चेहेर्याकडे पाहवत नव्हतं. खिशात चिट्ठी होती.

"मी हरलो, माझ्या नशिबापुढे! उभ्या आयुष्यात सुखाचे चार दिवस नाही देवू शकलो. पोरांचं शिक्षण थांबलं, मनी चा लग्न लांबलं. ह्याला मी जबाबदार आहे. हे शापित, दळभद्री आयुष्य मी संपवतो आहे. निदान तुमचं बाकी आयुष्यातरी सरकारनी दिलेल्या दीड लाख रुपयावर सुखी होईल"    
------------------------------------------------------------------------------------------------------

सध्या इतर भ्रष्टाचाराच्या गोंधळात टीव्ही आणि वर्तमानपत्रातून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या अतिशय गौण बनल्या आहेत. बऱ्याच लोकांच्या नजरेसही त्या पडत नसतील...पण वस्तुस्थिती फार वेगळी आहे, ह्या दुर्दैवी घटना अजूनही थांबलेल्या नाहीत. जो अन्न पिकवतो तोच इतका दुर्लक्षित राहिला तर पुढे काय?
कर्जमाफी फक्त बँकांमधून कर्ज घेतलेल्यांची झाली सावकार किंवा तत्सम कुणाकडून घेतलेल्यांची नाही. तुलनेनी अशा गावाच्या सावकाराकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या खूपच जास्त आहे. हे असाच चालू राहिला तर खायचा अन्न देखील भारताला आयात करावं लागेल यात शंका नाही.

सोमवार, २२ नोव्हेंबर, २०१०

राजकीय शुभेच्छा

सध्या महाराष्ट्रात अनेक युद्धे, शीतयुद्धे चालू आहेत. ठाकरे बंधूंचे मराठी युद्ध, मराठी-उत्तरभारतीयांचे युद्ध, भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांचे आपापसात युद्ध, अशी अनेक युद्ध चालू आहेत. पण हि अर्थात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात चालू आहे. परंतु महाराष्ट्र भर जे एकमेव युद्ध चालू आहे ते म्हणजे "होल्डिंग युद्ध". महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा विविध राजकीय पक्षांची, राजकीय वरदहस्त असलेल्या संस्थांचे शुभेच्छा संदेश देणारे, अभिनंदनाचे, वाढदिवसांचे होल्डिंग दिसल्याशिवाय राहणार नाही. यात कुठलाही पक्ष पिछाडीवर नाहीये. शिवसेना, भाजप, मनसे, काँग्रेस,रिपब्लिकन  यांच्या पुढाऱ्यांच्या फलकांच्या "फ्लेक्स"चे पेव फुटले आहे. या फलकांना फ्लेक्स म्हणतात हि मला नवीनच माहिती मिळाली. संगणक, डिजिटल प्रिंटींग मधील आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे फ्लेक्स फारच स्वस्तात आणि भव्य आकारामध्ये म्हणजे अगदी दोन-दोन मजले उंच देखील मिळू शकतात. 
या मोठमोठ्या फलकांमध्ये काहीही मजकूर असू शकतो "जीवेत शरद: शतम", भाऊंची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा, लालबागच्या राजाकडून सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत, जय शंभो प्रतिष्टान, A1 तोरन महोत्सव. सणांमध्ये या युद्धाला विशेष जोर येतो, दिवाळीच्या शुभेच्छा, ईद मुबारक, शिमग्याच्या शुभेच्छा अशा आणि अनेक. शुभेच्छुक म्हणून विविध राजकीय पक्षांचे होतकरू म्होरके असतात. शुभेच्छा संदेश कुठलाही असू दे त्या मध्ये त्या पक्षातील समस्त राजकारण्याचे फुल साईज पांढऱ्या स्वच्छ पोशाखातील फोटो मात्र असणारच.
उदाहरणासाठी असे समजा कि काँग्रेस पक्षातील बुरुम्बाड गावाचा एक नेता मा.श्री.सदाभाऊ सदावर्ते यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारा फलक आहे. फलक साधारण असा असेल, पार्श्वभूमीवर सोनिया गांधी, मनमोहन सिंग, राहुल गांधी, पृथ्वीराज चव्हाण यांचे जुन्या पिक्चरच्या जाहिरातीत 'बॉर्डर' वगेरे मध्ये असतात तसे फोटो, पुढे एका वर्तुळात उत्सवमुर्तींचा फोटो, खाली मजकूर 
                                    "जीवेत शरद: शतम"             
मा.श्री.सदाभाऊ सदावर्ते उर्फ तात्या (सरपंच-बुरुम्बाड) यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा
 शुभेच्छुक- श्री.शरद गवई, श्री.राज, एकता मित्र मंडळ,अफजल, इस्माईल फ्रेंड सर्कल 
(याच्या खाली वर नावे असलेल्या सगळ्यांचे फोटो-अर्थात पांढऱ्या कपड्यात)


अशा प्रकारच्या मोठमोठ्या फलकांनी शहरातील सर्व रस्ते, चौक, आणि काही इमारतीही व्यापल्या गेल्या आहेत. आधीच शहरात सर्वत्र घाण आहेच त्यात या 'फ्लेक्स' नि जमीनीवरचा भागही घाण  करून टाकला आहे, साहजिकच शहरांच रूप अजूनच विद्रूप झालंय. पुण्यामध्ये या गणेशोत्सवामध्ये जवळपास प्रत्येक मंडळातर्फे गणेश भक्तांचे स्वागत करणारे फलक लावले होते त्यात मंडळाचे सर्व कार्यकर्ते फोटोसकट आपणास दिसले असते. आमच्या घरजवळच्या एका फलकामध्ये कार्यकर्त्यांचेच जवळपास २५-३० फोटो होते कि मूळ शुभेच्छा संदेशच काय पण गणपतीसुद्धा दिसत नव्हता. 
मध्यंतरी कॉर्पोरेशननी या प्रकारच्या फलकांवर शुल्क आकारलं होतं. अर्थात कुणीही हे शुल्क भरत नाही. कारण कायदे करणारे पण तेच आणि मोडणारे पण. तसं पाहिलं तर ह्या प्रकारच्या फलकांना काहीच अर्थ नाहीये, महाराष्ट्राच्या कुठल्यातरी कोपऱ्यात नवनिर्वाचित राजकीय पदाधिकाऱ्यांचा अभिनंदनपर होल्डिंग अथवा फलक लावून काय साध्य होणार आहे हे ते फलक लावणारेच जाणोत. एक गोष्ट मात्र नक्की कि शहरांच्या विद्रुपीकरणाला यातून नक्कीच हातभार लागत आहे.       


हे सगळं अचानक मनात यायचं कारण म्हणजे महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाण. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाची शपत घेतल्यावर लगेचच सर्वत्र त्यांच्या समर्थकांनी अभिनंदनाचे फलक लावले. मात्र मुख्यमंत्रांनी तत्काळ एक निवेदन प्रसिद्ध करून ते उतरवविण्यास सांगितले. सर्व फलक काढले गेले का नाहीत हा वेगळा मुद्दा आहे पण मुख्यमंत्र्यांनी घेतलेला पहिला  निर्णय तरी महाराष्ट्राच्या भल्यासाठी आहे असा म्हणायला हरकत नाही. बघूया पुढे काय काय होते ते.

मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०१०

मला जगायचं होतं

रहस्य उलगडत नव्हतं, प्रश्नांनाही उत्तर नव्हतं
मी कोण कुठला हेच मला ठावूक नव्हतं,
पहिलं उद्दिष्ट हेच होतं, मलाच ओळखायचं होतं
जन्माआधीच सगळं संपलं, तरी मला जगायचं होतं

इच्छेचं पाखरू उडत होतं, सैरभैर फिरत होतं
मला खेळायचं होतं, मला शिकायचं होतं
प्रेमात पडायचं होतं, जग पाहायचं होतं
अपघाताचं निमित्त होतं, तरी मला जगायचं होतं

मला इंजिनियर, डॉक्टर, शास्त्रज्ञ व्हायचं होतं
मला अभिनेता व्हायचं होतं, मला नेता व्हायचं होतं
मला सचिन बनायचं होतं, मलामीर बनायचं होतं
काहीच होता गेलो तरी मला जगायचं होतं

शिक्षण, नोकरी, लग्न सारं काही रीतसर होतं
मुलांची प्रगती बघून अभिमानानं उर भरून येतं
कुटुंब-चक्रात आयुष्य अलगद निघून जातं
सारं काही झालं होतं, मनासारखं घडलं होतं,
वयहि खूप झालं होतं, मरणच फक्त उरलं होतं
तरी मला जगायचं होतं, तरी मला जगायचं होतं

मला हे करायचं होतं, मला ते करायचं होतं,
सगळं करायचं होतं, खूप काही करायचं होतं
अश्या विचारात सगळंच करायचं राहिलं होतं
काहीच केलं नाही तरी मला मात्र जगायचं होतं

प्राणपक्षी उडाला होता, स्वर्गाकडे निघाला होता
माझा मात्र प्रवासात हिशोब चालू होता
आयुष्यातील शून्य बघून गोंधळ उडाला होता
आता मात्र हे बदलण्याचा निर्धार पक्का होता

"सगळे हिशोब जुळतील, सगळी उत्तरं मिळतील
कितीही फिरलास तरी पुन्हा पुन्हा इथेच येशील"
कुणीतरी मला बोलावत होतं, काहीतरी सांगत होतं
मला काहीच कळत नव्हतं, मला पुन्हा जगायचं होतं

नेहमी हे असंच होतं, सालं नशीबच धोका देतं
तेच तेच दिसू लागतं, दुष्टचक्र मागे लागतं
त्यांनी काम केलं होतं, तुम्हाला बजावलं होतं
तेंव्हा तुला कळत नव्हतं, तुला तर जगायचं होतं