शनिवार, २६ फेब्रुवारी, २०११

श्रद्धेची दुकाने- १

सध्या माझा फार गोंधळ उडालेला आहे. हे सोन्याच्या सिंहासनात बसलेले साईबाबा, सोन्याचे पितांबर, माणिक मोत्यांनी मढ़वलेला मुकुट घालून बसलेले श्रीमंत दगडूशेट गणपती (देवही श्रीमंत, गरीब असे विभागले गेले आहेत), कोट्यावधीची संपत्ति असणारे तिरुपतिचे बालाजी...हे सगळे बघून हा गोंधळ अजुनच वाढत आहे.  अरे बापरे.... हे काय चालू आहे? सध्या देवाची भक्ति करणे म्हणजे नुसत नमस्कार करून, स्तोत्र म्हणून होत नाही तर जास्तीत जास्त पैसे, सोनं, चांदी, दक्षिणा दिलीत तर तुम्ही खरे भक्त. त्या देवस्थानांचे ट्रस्टी देखिल ह्या संपत्तीसंचयात बुडालेले दिसतात.
हे इथेच थांबत नाही तर ह्याच बरोबर अनेक बुआ, बाबा, महाराज, योगी, सतगुरु हे तर इतके झाले आहेत की त्यांची अजिबातच गणना नाही. जागोजागी ह्यांची प्रवचने चाललेली आपण पहात असालच.ह्या प्रवचनांना सत्संग म्हणतात. मी मधे ऐकले होते कि कुणाच्या तरी सत्संगाच्या शेवटच्या दिवशी महाराजांचा प्रसाद घेण्यासाठी प्रचंड गर्दी होते. प्रसाद म्हणजे काय तर अग्नीशमन दलाचे बंब मागवतात आणि त्यातुन रंगीत पाणी हे महाराज भक्त जनांवर पाइप ने उडवतात. ह्यात भक्त गण धुंद होवुन भिजत असतात, मग काय कधी कधी यात धक्काबुक्की होते, चेंगरा-चेंगरी होते, क्वचित प्रसंगी चोरीचे प्रसंग हि उद्भवतात.

पण या उदंड देव आणि महाराजामुळेच आपणासारख्या गरिब भक्तांना मोठा चॉइस मिळत आहे, मग कही लोक गणपतीचे निस्सीम भक्त; काहीही चांगलं झालं की निघाले सारसबागेत (किंवा दगडूशेट ला), हाच गणपतीचा भक्त मुंबईत असेल तर फक्त सिद्धिविनायक बाकी कुठलाही गणपती नाही, काही लोक शंकराचे, काही देवीचे, काही इतर कुणाचे, याच बरोबर काही महाराज आणि गुरुंना मानणारे देखिल आहेत. स्वत:ला प्रचंड मॉडर्न वगेरे समजणारे, देव वगेरे झूठ, अंधश्रद्धा अशा बाता मारणारे माझे काही मित्र साडेसाती आली की शनीच्या मंदिरात तेल आणि माळ घेवुन लाइन लावलेले दिसतात, आता ह्याल काय म्हणायचे? (तसा मॉडर्न आणि देवळात जाण्या न जाण्याचा काहीही संबंध नाहीये, माझं म्हणणं इतकच कि उगाच का मग बाता मारायच्या?)

साधारणतः भक्ति किंवा धार्मिक भावना अनुवांशिक असते. म्हणजे घरातील आई वडिल कुणा देवाला मानत असतील तर आपोआपचे ते गुण पुढील पीढित उतरतात. मुलही पुढे त्या महाराजांची पूजा-अर्चा करू लागतात. कधी कधी आयुष्यात येणारया संकटांना तोंड देता देता आपल्या आराध्य देवते वरील श्रद्धा म्हणूया किंवा विश्वास याचा क्षय होवू शकतो. पण यातच कुणी हितचिंतक अजुन एका बाबांचे नाव सुचवतो, 'त्यांच्या कड़े जा सगळे प्रश्न सुटतील सगळी संकट दूर होतील.' बाबांच्या नशिबानी त्या माणसाच्या सगळ्या चिंता दूर होतात, त्यादिवासपसून तो त्या बाबांचा निस्सीम भक्त कधी बनुन जातो हे त्यालाही कळत नाही.
आमच्या घरात लहानपणापासुनच तसा धार्मिक वातावरणात  मी वाढलो. दर गुरवारी, चतुर्थीला आरती यामुळे आरत्या, अथर्वशीर्ष हे अगदी तोंडपाठ. गणपतीत आरत्या म्हणताना, त्या नंतर चढ्या आवाजातील मंत्रपुष्पांजलि एका सूरत म्हणताना फार मजा यायची. घरी सोवळं ओवळं कडकपणे पाळलं जाई, असं सगळं असलं तरी आमच्या घरच्यांनी कधीही धार्मिकतेची सक्ती केली नाही, याबाबतीत संपुर्ण स्वातंत्र्य दिलं गेलं. कदाचित यामुळेच देवाबद्दल आणि धर्मासंबंधी अतिशय स्पष्ट मत बनण्यास मदत झाली.

मध्यंतरी आमच्या ऑफिस मधील एका ईटालीयन colleague नी हिंदू धर्माबद्दल माहिती विचारली, हिंदू धर्मात एक नाही दोन नाही तर तब्बल ३३ कोटी देव आहेत हे ऍकल्यावर तो अगदीच चकीत झाला, त्याचा चेहेरा पहाण्यासारखा झाला होता. मला तो विचारतो why? why? so mony gods? मला विचारतो तुमचं एका देवानी समाधान होत नाही का? 

खरंच चांगला प्रश्न आहे की का इतके सगळे देव?

अनेक पुर्वजांनी हे उत्तर आधीच देवुन ठेवलं आहे, त्यामुळे माझं उत्तर लगेच तयारंच होतं. यातील स्वामी विवेकानंदांचे उत्तर मला जास्त भावतंआणि योग्यही वाटतं.

'तुमचा समाज सामजिक द्रूष्ट्या विकसित झाला आहे प्रगत आहे, म्हणुनच सामजिक तत्वाबाबत समाजाला स्वातंत्र्य आहे, मोकळेपणा आहे, समाजाचे विचारही पुरोगामी आहेत. भारत याबाबत मागास असला तरी धार्मिक द्रुष्ट्या अतिशय प्रगत, विकसित आहे यात अजिबातच शंका नाहीये, कारण आपले आरध्य निवडी बद्दल कुठलीही सक्ती नाहीये, बंधनं नाहीयेत. तत्वतः सर्व देव एकच आहेत आणि त्यांची आराधना करणारे सर्व हिंदू आहेत. त्यामुळे दिसायला जरी ३३ कोटी देव असले तरी ते सर्व एकाच तत्वाची विविध रुपे आहेत.'
हि  माहीती ऐकून तो खरचं चकीत झाला, पुढे म्हणाला 'कि ह्या लॉजिक नी मी सुद्धा हिंदूच आहे, फक्त मी येशु ला मानतो, मी त्याचा भक्त आहे'

हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे वर नमुद केलेली सद्य परिस्थिती आणि आपली तत्वे ह्याची काहीच टोटल लागत नाहिये.  जागोजागी विखुरलेली भविकांची श्रद्धास्थाने हि श्रद्धेची दुकाने झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
धार्मिक द्रुष्ट्या पुरोगामी असलेले आपले पुरातन तत्वज्ञान, विचार ह्या श्रद्धेच्या दुकानांनी अगदीच कुचकामी केले आहेत. भक्ती जर वैयक्तिक दुर्बलतेच कारण होत असेल तर हिंदू धर्माचे जे अतिशय प्राचीन आणि अतिशय उदात्त असे जे तत्वज्ञान आहे त्याचे पुनर्जीवन करण्यासाठी तरुणांनी पुढील किमान ५० वर्षे तरी फक्त भारत भुमिलाच आपले देव मानण्याची गरज आहे

------------------------------------------------------------------------------------------------------

ह्या विषयावर लिहिण्यासारखं खुप आहे, यथावकाश याच विषयावर अजुन लिहिता यावं यासाठी '१' नी श्री-गणेशा केला आहे.           
                                    
      
                              

रविवार, १३ फेब्रुवारी, २०११

अडीचशे वर्षांचा लकडी पुल


पुणेकरांच्या गेल्या दहा पिढ्यांना ज्याने मुठेच्या एका तीरावरून दुसऱ्या तीरावर पोचवले, त्या लकड़ीपुलाच्या उभारणीस आज अडीचशे वर्षे पूर्ण होत आहेत. पानिपतावरून आलेले सैन्य शहरात येण्यासाठी याची उभारणी केली गेली, अशी या संदर्भात आख्यायिका आहे. १७६१ मध्ये वैशाख महिन्यात बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांनी लकडी पुलाचे काम सुरु केले. ते स्वतः या कामावर रोज जावुन पाहुन येत.
तीस दिवसांत हा पूल बांधला गेला, त्यानंतर अल्पावधीतच नानासाहेबांचे पर्वतीवर २३ जून १७६१ रोजी निधन झाले. त्यांना पुलानजीकच अग्नी देण्यात आला. त्यानंतर काही काळातच नारायणराव पेशवे यांचाही पुलानजीक अंत्यवीधी करण्यात आला. या घटनांप्रमाणेच पुलानजीक सावरकरांनी केलेली विदेशी कपड्यांची होळी, १८९३ पासून दरवर्षी येणारी अनंतचतुर्दशीची मिरवणुक व पुर्वीच्या काळात त्यानंतर होणार्या सांगता सभा, पावसाळ्यात मुठेचे दुथडी भरुन वाहणारे, पुलापर्यंत येणारे पाणी, १९५८ चा मोठा पूर व पानशेतचा प्रलय अशा अनेक घटनांचा हा पुल साक्षीदार आहे.

१७६१ मधे लाकडामध्ये बांधलेला हा पूल १८४० मध्ये आलेल्या पुरात मोडला व याच जागी पक्का पूल  बांधण्यात आला. यासाठी ४७ हजार रुपये खर्च झाला. या पैकी ११ हजार रुपये ब्रिटीशांनी पुणेकरांकदुन वसुल केले. तेव्हा हा पूल १८ फुट रुंदीचा बांधण्यात आला होता व रेल्वे सुरु होण्यापुर्वी मुंबईला जाण्यासाठी हाच मार्ग असल्याने येथे मोठी रहदारी असे. पूढे येथिल रहदारीस पूल अपुरा पडु लागल्याने १९२८ मध्ये पुलाची रुंदी ३७ फु करण्यात आली. या कामास ४०००० रुपये खर्च झाला. परंतु कालांतराने हे रुंदीकरणही अपुरे पडु लागले व पुन्हा एकदा १९५० मध्ये रुंदीकरणाचे  हाती घेण्यात आले. दिड वर्ष रोज २०० मजूरांनी काम करुन पूल ७६ फूट रुंद केला. १९५२ मध्ये जून महिन्यात हे काम पुर्ण होवुन त्याचे उद्घाटन झाले.याच काळात लकडीपुलाचे संभाजीपुल असे नामकरण करण्यात आले            

पुलाच्या रुंदीकरणाने १९४८ पर्यंत स्मशान असलेला भागही बदलुन गेला, लकडी पुल हा पुर्वापार पुणेकरांच्या जिव्हळ्याचा विषय राहिला आहे. लकडी पुलावर उभे राहुन मुठेच्या पूरात उड्या मारणे, हा प्रतीवर्षीचा उपक्रम. १३ जूलै १९६१ ला पुणेकरांनी पुलावर अशीच गर्दी केली होती, पण काहिकाळातच त्यांच्या लक्षात आलं की हा नेहमीचा पूर नाही.या पूरामुळे लकडी पुलाचे मोठे नुकसान झाले व पुढे ८ दिवस सैनिकांनी पादचारी व सायकलस्वार यांच्यासाठी पर्यायी पूल सुरु केला.
१७६१ पासुन १९२३ पर्यंत म्हण्जे १६२ वर्ष पुणे शहरात हा एकच पूल होता, पुढे १९२३ साली शनिवारवाड्यासमोरील पुलाचे काम पूर्ण झाले, आज पुण्यात मुठानदीवर १५ पूल आहेत. पण पुणेकरांच्या मनात व पुण्याच्या इतिहासात लकडी पुलास मानाचे स्थान आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
सौ: सकाळ